हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार आणि एआएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा दांडी मारली आहे. आमदार झाल्यापासून जलील मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत आहे.

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यापासून इम्तियाज जलील हे हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहत होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जलील यांचा विजय झाला आणि ते औरंगाबादचे खासदार झाले. त्यामुळे यंदा ते मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहणे सर्वांना अपेक्षित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यानात हैदराबाद मुक्तीसंग्रामातील शहिदांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा सोडून ध्वजारोहणाला हजर झाले असताना खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र दांडी मारली. तर कार्यक्रमातील जलील यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली.

गेली चार वर्षे आमदार असताना इम्तियाज जलील हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहणास गैरहजर होते. मराठवाडय़ात १७ सप्टेंबर हा दिवस रझाकारापासून मुक्तीचा मानला जातो. इतिहासातील एमआयएम हा पक्ष रझाकारांच्या बाजूचा होता. आता तो नवा आहे. त्यामुळे आजचा एमआयएम पक्ष वेगळा आहे, हे ध्वजारोहणास उपस्थित राहून दाखवून द्यावे, अशी अपेक्षा पत्रकार निशिकांत भालेराव यांनी व्यक्त केली होती. त्यावर “माझ्या उपस्थिती अथवा अनुपस्थितीवरून कुणी माझ्या देशभक्तीची तुलना करू नये, असे विचार डोक्यात येणे यातून संबंधिताची मानसिकता लक्षात येते. देशभक्तीचं प्रमाणपत्र मला अशा मानसिकतेच्या लोकांकडून घेण्याची गरज नाही,” असे उत्तर दिले होते. त्यात मंगळवारच्या कार्यक्रमाला खासदार जलील हे गैरहजर राहिल्याने वादाला तोंड फुटले आहे.

दरवर्षी होतो कार्यक्रम-

स्वामी रामानंद तीर्थ, आ. कृ . वाघमारे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी मोठा लढा दिला. अनेकांनी हौतात्म्य पत्करले. भारत सरकारने ‘ऑपरेशन पोलो’ हातात घेत हैदराबाद संस्थान विलीन करून घेतले. या सशस्त्र कारवाईनंतर अनेक वर्षे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात असे. मात्र, त्याला पुढे शासकीय स्वरूप देण्यात आले. दरवर्षी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण करण्यात येते.