औरंगाबाद महापालिका निवडणूक नामांतराच्या मुद्द्याभोवतीच घुटमळणार असल्याचे संकेत दिसत आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. भाजपाकडून या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपा यांच्यात संभाजीनगरच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत. नामांतराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा जोर देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाचं म्हणजे महापालिकेत भाजपाची सत्ता आली, तर पहिल्याच सभेत नामांतराचा ठराव मंजूर करू,” असा दावा पाटील यांनी केला आहे.

आणखी वाचा- ‘तो’ प्रस्ताव दिल्लीत का रखडला हे भाजपाने जनतेला सांगावं; संजय राऊतांचा थेट सवाल

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याच्या प्रश्नावर बोलताना पाटील, म्हणाले,”आम्हाला यात राजकारण आणायचं नाही. मी आधीच बोललो आहे की औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं, अहमदनगरचं नाव अंवती करावं. हे सगळे श्रद्धेचे विषय आहेत. शेवटी राम जन्मभूमी मुक्त होण्याचा विषय सगळ्यांनी स्वीकारला. मुस्लिमांनीही स्वीकारला. तो अस्मितेचा विषय होता. मंदिर होण्याचा नाही, राम मंदिर या देशात किमान १० हजार असतील. औरंगजेब कुणाचा पूर्वज असू शकतो का, मग औरंगाबाद या नावाचा आग्रह कशासाठी. औरंगाबादऐवजी दुसरं नाव असेल, तर त्याची चर्चा करा. संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य आहे. मग ते का द्यायचं नाही,” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा- “नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं करा”; उद्धव ठाकरेंना आमदाराने सूचवलं नाव

“मुद्दा असा आहे की, तुमच्या राज्यात नामांतर का नाही. तर त्याचीही मी माहिती घेतली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी असा निर्णय घेतला. पण त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान मिळालं. त्यानंतर सरकारने प्रस्ताव मागे घेत असल्याचं सांगितलं. त्यामुळे याची सगळी प्रक्रिया नव्यानं करावी लागणार आहे. महापालिकेत करावी लागेल, नंतर राज्य सरकारला करावं लागेल. नंतर केंद्राकडे पाठवावा लागेल. महापालिका शिवसेनेच्या ताब्यात होती. पहिला प्रस्ताव रद्द झाला, तर नव्याने प्रस्ताव करायला हवा होता. आम्ही असं आश्वासनं लोकांना देतो की, आम्हाला महापालिकेत सत्ता द्या, पहिल्या बैठकीत संभाजीनगरचा ठराव मंजूर करू. काँग्रेसने याला विरोध केला आहे. त्यामुळे हा जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावण्यासाठी सत्ता पणाला लावायची की नाही, हे शिवसेनेला ठरवायचं आहे आणि तिथेच राजकारण आहे. किंवा शिवसेनेनं काँग्रेसची मन परिवर्तन करावं,” असा सल्ला पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे.