जागतिक छायाचित्रण दिनानिमित्य आयोजित आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत वर्धा येथील युवा छायाचित्रकार राहुल तेलरांधे यांनी काढलेल्या छायाचित्रास पुरस्कार मिळाला आहे.

नागपूरच्या फोटोग्राफर अ‍ॅण्ड डिझाईनर असोसिएशनतर्फे ही ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. करोना व टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेसाठी ‘स्ट्रीट लाईफ ’ हा विषय ठरवण्यात आला होता. स्पर्धेला भारतातील विविध राज्यातील छायाचित्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. राहूल तेलरांधे यांनी आपल्या कॅमेराच्या तीक्ष्ण नजरेतून रस्त्यावरील एका मजूर कुटुंबाला टिपले. त्याच्या या छाचित्राला तृतीय पुरस्कार मिळाला. स्पर्धेचे परीक्षण प्रसिध्द छायाचित्रकार सी.आर. शेलारे यांनी केले होते.

हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वर्धा छायाचित्रकार संघटनेने तेलरांधे यांचे अभिनंदन केले. छायाचित्राच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांची वेदना समाज व शासनापूढे मांडण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. या छाचित्राच्या माध्यमातून हीच भावना आपण मांडल्याचे तेलरांधे यांनी सांगितले आहे.