माजी मंत्री बबन घोलप यांचा विश्वास

मागासवर्गीय समाजाच्या सर्व पोटजाती एकत्र येऊन एकच झेंडा, एकच नेता, एकच वचन राहिल्यास राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्रीही मागासवर्गीय होतील, असा विश्वास माजी मंत्री व शिवसेनेचे उपनेते बबन घोलप यांनी व्यक्त केला.

जिल्हा मातंग समाज समन्वय समितीच्या वतीने रविवारी समाजाच्या १३ विविध संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा नाशिक रोड येथील महात्मा गांधी सभागृहात झाला. मेळाव्यात उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना घोलप यांनी मागासवर्गीयांनी उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर काम करून समाजाची प्रगती करावी, असे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मागासवर्गीयांचे परमेश्वर असून त्यांच्या विचारांशी सहमत झाले पाहिजे. आज त्यांच्या विचारांशी सहमत झालेले उच्च पदावर काम करीत आहेत. समाजाने फक्त निवडणुकीसाठी एकत्र न येता आपल्या विविध मागण्यांसाठी एकत्र राहिले पाहिजे. समाजाची निष्ठा बाळगून तुमच्यात जागृती, वैचारिकता वाढल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. जोपर्यंत आपण शिक्षणाला महत्त्व देणार नाही तोपर्यंत उत्कर्ष नाही. युती शासनाच्या वेळी आपण समाजकल्याणमंत्री असताना मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली होती. आश्रमशाळा सुरू केल्या. त्याचप्रमाणे सहकार क्षेत्रात मागासवर्गीयांना संधी मिळून दिली. समाज एकत्र राहिला तर सत्ता समाजाला मान देते. प्रत्येक समाजाने पारंपरिक व्यवसाय बाजूला ठेवून इतर क्षेत्रांत प्रगती केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, प्रभाग सभापती सूर्यकांत लवटे, माजी महापौर नयना घोलप आदी उपस्थित होते. प्रास्तविक साहेबराव शंृगार यांनी, सूत्रसंचालन सूर्यकांत भालेराव यांनी केले. आभार कार्यक्रमाचे आयोजक अमोल आव्हाट यांनी मानले.