मनोहर भिडे यांनाच मुलं झाली नाहीत, तर त्यांच्या आंब्याने काय मुलं होणार. ते स्वतःला शिक्षणातील गोल्ड मेडलिस्ट म्हणवतात. ते जर असं वक्तव्य करत असतील तर त्यांच्यावर गुन्हाच दाखल करायला हवा असे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

हे खाल्लं के ते होतं असं बोलून फायद्याच्या गोष्टी सांगितल्या जात असतील तर आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात तशी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. त्याचा रिपोर्ट देऊन आम्ही गुन्हा दाखल कसा होईल हे पाहतोय. आता आम्हाला भिडेलाच आंबे खायला घालावे लागतील. किमान पुरुषाकडून डिलिव्हरी होईल अन यानिमित्ताने नवा उपक्रम सुरू होईल असे आमदार बच्चू कडू पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

काय म्हणाले आहेत संभाजी भिडे 
माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं अजब वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नाशिकमधील एका सभेत ते बोलत होते.
“लग्न होऊन १५ वर्ष झालेल्यांनाही मुलं होतं नाहीत. अशा स्त्री, पुरुषांनी ही फळं खाल्ल्यास त्यांनी निश्चित मुलं होतील. मी आतापर्यंत १८० हून जास्त जणांना तसंच जोडप्यांना हे फळ खायला दिलं असून १५० पेक्षा जास्त जणांना मुलं झाली आहेत”, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल असाही दावा त्यांनी केला आहे.

माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं वक्तव्य करुन अंधश्रद्धा पसरवणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात कारवाई करण्यासाची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्या समर्थकांना ते आपल्याला कोणत्या युगात नेत आहेत हे पहावं असंही त्यांनी म्हटलं आहे.