विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या दोघा काँग्रेस नेत्यांमधील गटबाजीपुढे राज्यातील काँग्रेस नेतृत्व हतबल असले तरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राजकीय अपरिहार्यता, कार्यकर्त्यांचा रेटा व भाजपाच्या वाढत्या प्रभावामुळे दोघांवरही एकत्र येण्याची वेळ आली आहे. नेतृत्वाने हस्तक्षेप न करता काँग्रेसला पहिला क्रमांक मिळवून देण्यासाठी त्यांच्यातील शीतयुद्ध तूर्तास थांबले आहे.

नगर जिल्ह्यातील थोरात व विखे हे दोघेही काँग्रेसचे मातब्बर नेते असून त्यांचे संस्थात्मक जाळे असल्याने स्वत:च्या प्रभावक्षेत्रात त्यांचे राजकीय बस्तान बसलेले आहे. आघाडीची सत्ता असताना दोघेही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते. त्या वेळी त्यांच्यात शीतयुद्ध असले तरी एकमेकांवर जाहीर टीका करण्याचे त्यांनी टाळले, पण पालिका निवडणूक निकालानंतर मात्र थोरात यांनी विखे यांच्यावर जाहीर टीका केली. विखे यांची भारतीय जनता पक्षाबरोबर छुपी युती असल्याचा आरोप केला. थोरात यांच्या टीकेला विखे यांनी उत्तर देण्याचे टाळत पालिका निवडणुकीत काँग्रेसची बांधणी आपण केली. त्या वेळी थोरात संगमनेर सोडून अन्यत्र गेले नाही. ते गप्प का बसले, असा सवाल विखे यांनी केला. मात्र नंतर दोघांमधील आरोप – प्रत्यारोप काँग्रेस नेत्यांनी दोघांनाही पक्ष अडचणीत असताना थांबविण्याचा सल्ला दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी थोरात यांना महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या जाहीरनामा समितीवर घेतले. पक्षाने त्यांची दखल घेऊन स्थान देण्याचा प्रयत्न केला. दोघांत मतभेद असले तरी आता मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्य़ात पहिला क्रमांक टिकवून ठेवण्याचे आव्हान असल्याने त्यांनी तूर्तास एकमेकांवरील टीका थांबविली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी दोघांशीही चर्चा करून त्यात मध्यस्थाची भूमिका पार पाडल्याने सध्यातरी पक्ष एकत्रितरीत्या निवडणुकीला सामोरा जाताना दिसत आहे.

नगर जिल्ह्य़ात भारतीय जनता पक्षाने पालिका निवडणुकीत चांगली कामगिरी करून काँगेसला धक्का दिला. आता पालकमंत्री राम िशदे यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक तालुक्यात जाऊन जोरदार मोच्रेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे २७ सदस्य होते. भाजपात प्रवेश करून आमदार झालेले बाळासाहेब मुरकुटे यांच्या पत्नी आशा व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांच्या पत्नी सुनीता यांनी पक्षाचा राजीनामा दिला. दोघींनी भाजपात प्रवेश केला. आता २५ सदस्यांचे संख्याबळ गाठण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे.

थोरात हे काँग्रेसमध्ये असले तरी सर्वपक्षीयांशी नेत्यांशी त्यांची स्थानिक राजकारणात जवळीक होती. तर या नेत्यांच्या विरोधातील विविध पक्षांत असलेल्या कार्यकत्रे व नेत्यांशी विखे यांची जवळीक होती. त्यामुळे जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँक आदी संस्थांच्या राजकारणात दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात असत, मात्र लोकसभा व विधानसभेनंतर राजकीय चित्र बदलले. विखे यांचे समर्थक बाळासाहेब मुरकुटे हे भाजपाकडून आमदार झाले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भांगरे हेदेखील भाजपात गेले. तनपुरे विरोधात शिवाजी कíडले यांना विखेंची मदत होत असली तरी ते भाजपात आहेत. विखे समर्थक माजी आमदार नंदकुमार झावरे यांचा पूर्वी राष्ट्रवादीचे सुजित झावरे यांच्याशी संघर्ष होता. पण तेथे सेनेचे आमदार विजय औटी यांचे राजकीय बस्तान बसल्याने दोघे झावरे एकत्र आले आहे. पक्षीय राजकारणाच्या बदलत्या समीकरणामुळे काँग्रेसला मोठी कसरत करण्याची वेळ  आली आहे.

विधान परिषदेचीही मात्रा

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून थोरात यांचे मेहुणे आमदार डॉ. सुधीर तांबे हे पुन्हा काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आहेत. तांबे हे मितभाषी असून त्यांचे सर्वच पक्षात जसे संबंध आहेत, तसेच विखे यांच्याशी व्यक्तिगत संबंध ते टिकवून आहेत. त्यामुळे आता थोरात यांची भूमिकाही विखेंविरोधी फारशी आक्रमक नाही. तांबे यांच्यामुळे थोरात – विखे यांच्या राजकीय विरोधाची धार काहीशी बोथट झाली आहे.