07 August 2020

News Flash

युती झाल्याने शिवसेनेची चिंता मिटली!

युती झाल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

कल्याण

जयेश सामंत / भगवान मंडलिक

शिवसेनेची उत्तम पकड असलेला मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपने शिवसेनेला तोडीस तोड आव्हान उभे केले आहे. युती नसती तर शिवसेनेसाठी कडवे आव्हान उभे ठाकले असते. पण युती झाल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

भाजप आणि शिवसेनेत युतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीच्या बाजूने अनुकूल भूमिका मांडली होती. अर्थात याला किनार कल्याण मतदारसंघाची होती. कारण युतीशिवाय कल्याणमध्ये पुत्राची खासदारकी कायम राहणे सोपे नाही हे शिंदे यांनाही लक्षात आले होते.  डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्य़ात शिवसेनेला बेजार केले होते.  खासदार शिंदे यांच्याविरोधात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांना िरगणात उतरवले आहे. या मतदारसंघातील शिळफाटा ते २७ गाव आणि पुढे अंबरनाथ, कल्याण, बदलापुरातील काही ग्रामीण पट्टय़ांत आगरी मतदारांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी येथून निवडणूक लढवावी असा आग्रह काही स्थानिक नेत्यांनी धरला होता. असे असताना नाईक यांच्या निष्ठावंतांमध्ये ओळखले जाणारे बाबाजी यांना रिंगणात उतरवून ही निवडणूक जातीय समीकरणांसोबत स्थानिक प्रश्नांवर शिवसेनेला आलेल्या अपयशाच्या मुद्दय़ांवर नेण्याचा प्रयत्न आघाडीचे नेते करू पाहात आहेत. मात्र शिवसेना-भाजपची या भागातील परंपरागत मते पाहता हा प्रयत्न वाटतो तितका सोपा नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा आगरीबहुल आणि शिवसेनेचे वर्चस्व असलेला मतदारसंघ. अगदी वसंत डावखरे यांच्यासारखा तगडा उमेदवारही शिवसेनेच्या विरोधात पराभूत झाला होता.

कळवा-मुंब्र्याचा अपवाद वगळला तर या मतदारसंघातील उर्वरित विधानसभा क्षेत्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्वीइतका प्रभाव राहिलेला नाही. उल्हासनगरात ज्योती कलानी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार असल्या तरी त्यांचे पुत्र ओमी यांनी महापालिका निवडणुकीत भाजपची साथ धरली आहे.  अंबरनाथ, कल्याण या भागांत शिवसेनेची ताकद मोठी असून डोंबिवली भागात भाजपचा वरचष्मा आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील दिवा आणि २७ गाव परिसरात शिवसेनेची चांगली ताकद असली तरी स्थानिक आमदार सुभाष भोईर यांच्या कामाविषयी मात्र फारसे समाधानकारक चित्र नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील शिळफाटा परिसरातील देसई गावचे रहिवासी. जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष होते. ठाणे पालिकेत नगरसेवक आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर वैयक्तिक, कौटुंबिक संबंध वगळता त्यांना शहरी पट्टय़ातील त्यांचा संपर्क मात्र यथातथाच आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे बाबाजी किती आव्हान उभे करतील याविषयी संदिग्धता आहे.

रेल्वे, पायाभूत सुविधांचे प्रश्न कायम

पायाभूत सुविधांच्या आघाडीवर तीनतेरा वाजलेली शहरे या मतदारसंघात आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना भाजपची सत्ता असली तरी ही शहरे नियोजनाच्या आघाडीवर फसली आहेत. कल्याण ते सीएसटी हा मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे प्रवास अजूनही सुसह्य झालेला नाही. खासदार शिंदे यांनी या प्रश्नांविषयी गेल्या काही वर्षांत सजग भूमिका घेतल्याचे अनेकदा पाहायला मिळाले असले तरी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या शिवसेना-भाजपच्या संघर्षांत अजूनही अनेक प्रश्न जैसे थे आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावे, अंबरनाथ, बदलापूर, मलंगपट्टी भागातील गावांमधील रस्ते, पाणी प्रश्न सोडविण्याला खासदारांनी पक्षातील आमदार तसेच स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. असे असले तरी स्थानिक पातळीवर मजबूत संघटना ही शिवसेनेची आणि खासदार शिंदे यांची जमेची बाजू मानली जाते.

लोकांना विश्वासात घेऊन कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी, ग्रामीण भागात रेल्वे, रस्ते, पाणी, पथदिवे, मेट्रो मार्ग अशी कामे मंजूर केली आहेत. काही कामे पूर्ण झाली आहेत. काही कामे मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विकासकामे पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न मी केला आहे. लोकांच्या विश्वासाला तडा जाईल अशी कोणतीही कृती केली नाही. कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. या निवडणुकीत विकासकामांच्या बळावर आम्ही मोठय़ा फरकाने विजयी होऊ.

– डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना खासदार

खासदार श्रीकांत शिंदे यांनी विकासाच्या घोषणा केल्या होत्या त्या पूर्ण केलेल्या नाहीत. शिळफाटा रस्त्यावरची वाहतूक कोंडी सोडविण्यात ते अपयशी ठरले. नेवाळी विमानतळाच्या जागेचा प्रश्न स्थानिक भूमिपुत्रांना त्रासदायक ठरत आहे. तो प्रश्न कायमचा सोडविणे, २७ गावे पालिकेत घेऊनही सत्ताधारी शिवसेना-भाजपने या गावांमध्ये पाणी, रस्ते, विकासाच्या सुविधा दिल्या नाहीत. या भागातील बेकायदा बांधकामे रोखण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे.

– बाबाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार

विधानसभेचे चित्र

अंबरनाथ       शिवसेना

उल्हासनगर     राष्ट्रवादी

कल्याण पूर्व     अपक्ष

डोंबिवली        भाजप

कल्याण ग्रा.     शिवसेना

मुंब्रा-कळवा      राष्ट्रवादी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2019 12:31 am

Web Title: because of the alliance shiv senas concern got settled
Next Stories
1 ‘धनुदादा’ ही हाक आता ऐकायला मिळत नाही, धनंजय मुंडेंचे भावूक वक्तव्य
2 अमोल कोल्हे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे प्रक्षेपण सुरूच राहणार
3 रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात प्रवेश करणार, राष्ट्रवादीला धक्का
Just Now!
X