भीमा कोरेगावच्या घटनेने संघ आणि भाजपा दलितविरोधी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राज्यभरात सध्या भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेवरून मोठा तणाव निर्माण झाला आहे. राजकीय वर्तुळातही या सगळ्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करून भीमा कोरेगावच्या घटनेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला जबाबदार धरले.

समाजात दलित हे सगळ्यात खालच्या स्तरावर राहिले पाहिजेत, हा संघ आणि भाजपच्या फॅसिस्ट विचारसरणीचा मुख्य गाभा आहे. उना येथे दलितांना झालेली मारहाण, रोहित वेमुलाची आत्महत्या आणि आता भीमा कोरेगावची घटना या तीन घटना त्याची ठळक उदाहरणे आहेत. त्यावरून संघ आणि भाजपाच्या तीव्र दलितविरोधी विचारसरणीचे पुन्हा एकदा दर्शन झाल्याची टीका राहुल यांनी केली.

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद

तत्पूर्वी या घटनेचा निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे त्यांनी या घटनेसाठी पोलीस आणि हिंदुत्त्ववादी संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाकडे आलेल्या जमावावर दगडफेक केली, हिंसाचार भडकवला. यावेळी पोलिसांची कुमक योग्यवेळी घटनास्थळी आली नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. या पार्श्वबूमवीर भीमा-कोरेगाव हिंसेप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी, खुनी हल्ला, दंगल, हत्यारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.