महाबळेश्वर येथील लॉडवीक पॉईंट या ठिकाणाहून सेल्फी घेताना एक पर्यटक दरीत कोसळला. तिथल्या ट्रेकर्सच्या मदतीने या पर्यटकाला दरीतून बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या पर्यटकाचा मृत्यू झाला. विनोद शंकर जाधव असे या पर्यटकाचे नाव आहे. तो भिवंडी येथे रहात होता.

विनोद शंकर जाधव त्याच्या मित्रांसोबत फिरायला महाबळेश्वर या ठिकाणी गेला होता. तिथे लॉडविक पॉईंट पहात असताना त्याला सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. धोकादायक कठड्याच्या टोकावर जाऊन सेल्फी काढतानाच विनोद 300 फूट खोल दरीत कोसळला. ही घटना घडताच त्याच्या मित्रांनी आराडा ओरडा सुरु केला. त्यावेळी जवळ असलेल्या पर्यटकांनी आणि ट्रेकर्सनी विनोदला दरीतून बाहेर काढले आणि तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.

धोकादायक कठड्यांची सूचना अनेक ठिकाणी लावलेली असते, पर्यटकांना सावध करण्याचे काम प्रशासनातर्फे करण्यात येते. तरीही पर्यटकांना धोकादायक ठिकाणी जाऊनच सेल्फी काढायचा असतो. त्यामुळेच असे अपघात घडतात.