महाविद्यालयीन युवकांच्या कलेला नवे व्यासपीठ देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पध्रेच्या महाअंतिम फेरीत रत्नागिरी विभागातून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘भोग’ या एकांकिकेने धडक मारली आहे. सांघिक विजेतेपदाबरोबरच लेखन वगळता सर्व वैयक्तिक पुरस्कारांवरही ‘भोग’च्या कलाकारांनी आपले नाव कोरले.

या केंद्राच्या विभागीय अंतिम फेरीत नवनिर्माण महाविद्यालयाच्या ‘गिमिक’ आणि डीबीजे महाविद्यालयाच्या ‘अपूर्णाक’ या एकांकिकांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
या फेरीतील विजेत्या एकांकिकेच्या संघाला येत्या १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या राज्य पातळीवरील महाअंतिम फेरीत कला सादर करण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने आयोजित या एकांकिका स्पध्रेची रत्नागिरी केंद्राची विभागीय अंतिम फेरी शनिवारी येथील कणकवलीच्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाटय़ मंदिरात मोठय़ा उत्साहात पार पडली. या विभागाची प्राथमिक फेरी गेल्या २ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत पार पडली होती. त्यातून गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (भोग), नवनिर्माण महाविद्यालय (गिमिक), डीबीजे महाविद्यालय, चिपळूण (अपूर्णाक), स.का.पाटील महाविद्यालय, मालवण (फ्लाइंग क्वीन्स) आणि कला वाणिज्य महाविद्यालय, ओरोस (संजीवनी) या महाविद्यालयांच्या संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. रसिक कणकवलीकर आणि महाविद्यालयीन युवक-युवतींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात या एकांकिका शनिवारी सादर करण्यात आल्या. त्यामध्ये अखेर ‘भोग’ने बाजी मारली. या एकांकिकेमध्ये अंधश्रद्धेचा प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला. तसेच त्याबद्दल सकारात्मक संदेश देण्यात आला.
कणकवलीच्या नगराध्यक्ष माधुरी गायकवाड आणि तहसीलदार समीर घारे आणि ‘लोकसत्ता’चे उपसरव्यवस्थापक सुरेश बोडस यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. परीक्षकांच्या वतीने समेळ आणि चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.शरद सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
या विभागीय अंतिम फेरीसाठी प्रसिद्ध रंगकर्मी अशोक समेळ, डॉ. राजेंद्र चव्हाण आणि कणकवलीच्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे विश्वस्त वामन पंडित यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पध्रेसाठी रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम आणि संपूर्ण स्पध्रेचे टेलिव्हिजन पार्टनर म्हणून झी मराठी नक्षत्र काम पाहत आहेत. तसेच यंदा या स्पध्रेसाठी नॉलेज पार्टनर म्हणून स्टडी सर्कल ही संस्थाही सहभागी झाली आहे.

स्पध्रेतील वैयक्तिक पुरस्कारविजेते
सत्यविजय शिवलकर (पुरुष- भोग) व विदिशा म्हसकर (स्त्री- भोग) हे सवरेत्कृष्ट अभिनयाबद्दल व्यक्तिगत पुरस्कारांचे मानकरी ठरले. त्याचबरोबर नीलेश गोपनारायण (दिग्दर्शन- भोग), सुरेश जाधव, राजेश पवार (नेपथ्य- भोग), ओंकार भोजने (लेखन- अपूर्णाक), (संगीत-आसावरी भालेकर, अजिंक्य कोल्हटकर- भोग) आणि अथर्व आमरडकर, सुबोध आमकर (प्रकाशयोजना- भोग).