अशोक तुपे

शेतशिवारात गेलेले पक्षी हे टाळेबंदीच्या अवघ्या २१ दिवसांत पुन्हा मानवी वस्तीजवळ परतून आले आहेत. एवढेच नव्हे तर परदेशी पाहुण्या पक्ष्यांचाही मुक्काम वाढला आहे. त्यामुळे आता पक्ष्यांच्या किलबिलाटाने पुन्हा दिवसाची सुरुवात होऊ लागली आहे.

टाळेबंदीमुळे वाहनांची वर्दळ थांबली असून त्यामुळे प्रदूषण व आवाज, लोकांचा अवाजवी संचार पूर्णपणे थांबलेला आहे. असे यापूर्वी कधीही घडले नसल्याने या घटनेचा पक्षिजीवनावर झालेला परिणाम अभ्यासण्यासाठी नगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्रामार्फत एक जिल्हास्तरीय सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये सातत्याने पक्षिनिरीक्षण करणाऱ्या १० तालुक्यांमधील एकूण १६ पक्षी अभ्यासकांनी भाग घेऊन नोंदी केल्या. त्यांनी केलेल्या निरीक्षण नोंदींवरून मिळालेले काही सामान्य निष्कर्ष नोंदविले आहेत.

मानव वसाहतींजवळ चिमणी, कावळा, बुलबुल, राखी वटवटय़ा, शिंजीर, तांबट, भांगपाडी मैना, साळुंकी, कोकीळ, चिरक या पक्ष्यांची संख्या पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे. पूर्वी हे पक्षी हे शेतशिवारात गेले होते. ते आता पुन्हा घराजवळ परतले आहेत. ग्रामीण भागातही चिमण्यांची संख्या पूर्वीपेक्षा वाढली असून शहरी भागामध्येही जिथे चिमण्या अजिबात दिसत नव्हत्या, आता थोडय़ाफार प्रमाणात चिमण्या दिसू लागल्या आहेत. कावळ्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच जंगली कावळेही दिसू लागले आहेत.

हळद्या, निळा कस्तुर, कृष्णथिरथिरा, निखार व नीलिमा हे क्वचितच आढळणारे पक्षी आता अंगणात अधूनमधून सातत्याने हजेरी लावत आहेत, असेही दिसून आले.

पक्षी सर्वेक्षणात समूहप्रमुख जयराम सातपुते यांच्यासह डॉ. सुमन पवार, डॉ. अतुल चौरपगार, संदीप राठोड, सचिन चव्हाण, प्रतिम ढगे, डॉ. नरेंद्र पायघन, मिलिंद जामदार, शिवकुमार वाघुंबरे, स्नेहा ढाकणे, सुनील वाघुंबरे, आशा कसबे, अनमोल होन, शशी त्रिभुवन, राजेंद्र बोकंद, वेदांत देवांग आदी पक्षिअभ्यासक सहभागी झाले होते.

परदेशी पक्ष्यांचा मुक्काम वाढला

हिवाळ्यात युरोपमधून भारतात येऊन उन्हाळ्याच्या सुरुवातीला परतीच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या रोझी स्टारलिंग अर्थात पळसमैना, भोरडी या पक्ष्यांनीही भारतात आपला मुक्काम वाढविलेला दिसून येत आहे. हे पक्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नगर जिल्ह्य़ात येतात. कर्जत, पाथर्डी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर या तालुक्यांत त्यांचे वास्तव्य असते. ते मार्चअखेरीला निघून जातात. त्यांनी आपला मुक्काम लांबविला आहे. आजही ते मोठय़ा संख्येने दिसत आहेत. तर मनुष्यवस्तीजवळ सतत निवास करणाऱ्या पारवा पक्ष्यांच्या संख्येत घट झालेली दिसून येते.