राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. या जागेवर आबांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तासगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कै. आर. आर. पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादीने निश्चित केले होते. या ठिकाणी पुढील महिन्यात ११ तारखेला मतदान होणार असून, १५ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात प्रीतम मुंडेंविरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला नव्हता. त्याचप्रमाणे तासगावमध्ये आर. आर. पाटलांच्या परिवारातील उमेदवाराविरोधात भाजप उमेदवार देणार नसल्याची माहिती भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी दिली आहे.
याशिवाय, आर आर पाटलांच्या परिवारातील कुणी तासगावच्या पोटनिवडणूक लढणार असेल, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी सांगितले. आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता या राजकीयदृष्टय़ा सक्रिय असून, युवती आघाडीच्या माध्यमातून त्या काम करतात. विधानसभा निवडणुकीत आर. आर. यांच्या प्रचाराची सारी सूत्रे स्मिता यांनीच हाताळली होती. मात्र, निवडणूक लढविण्यासाठी आर. आर. यांच्या कन्येचे वय कमी पडत असल्याने त्यांच्या पत्नी सुमनताई यांना उमेदवारी देण्याचे पक्षाने निश्चित केल्याचे समजते.