महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडली. २०० पेक्षा जास्त जागा मिळवून सत्तास्थापनेचं स्वप्न पाहणाऱ्या सत्ताधारी भाजपा-सेनेला यंदा मतदारांनी धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या विरोधी पक्षांच्या जागांमध्ये यंदा चांगलीच वाढ झाली आहे. अनेक जागांवर बंडखोरांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसला. याचसोबत सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना पराभवाचा झटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनीवास पाटील यांनी उदयनराजेंवर मात करत सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे राखली.

साताऱ्याचा निकाल हा भाजपा आणि महायुतीसाठी धक्कादायक मानला जातो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश करत पोटनिवडणुकीत उडी मारली होती, मात्र त्यांचं हे पक्षांतर मतदारांना अजिबात रुचलं नाही. या पराभवानंतर उदयनराजेंनी, जिंकलो नाही पण संपलो ही नाही अशा आशयाचं ट्विट करत सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.

मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये उदयनराजे पहिल्या काही फेऱ्यांचा अपवाद वगळता पिछाडीवरच होते. उदयनराजेंसोबतच विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. परळीतून पंकजा मुंडे, मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे, पुरंदरमधून शिवसेनेचे विजय शिवतारे, बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून सेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांनाही पराभव पत्करावा लागला आहे.