मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकीकडे भाजपाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असताना दुसरीकडे काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून आंदोलन करत टीका केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत गेल्या ६० वर्षात काँग्रेसने केलेल्या कामावरच देशाचा कारभार सुरु असल्याची टीका केली आहे. दरम्यान त्यांच्या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात बोलताना उत्तर दिलं आहे.

काँग्रेसचं सरकार असताना झालेल्या पुण्याईमुळेच देशाचा कारभार सुरु आहे – संजय राऊत

“पंतप्रधान त्यांची सूचना मान्य करतील, मी त्यांच्या वतीने निरोप देतो. पण त्यांनी जरा हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसमोर शांतपणे बसावं, डोळे मिटावे आणि तुमचंही मत हेच आहे का असं विचारावं. त्यावेळी ते वरुन एक थोबाडीत मारतील,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

संजय राऊत काय म्हणाले आहेत –
“देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्षे गेली, पण पंडित नेहरुंपासून ते राजीव गांधीपर्यंत, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत जर आपण लेखाजोखा पाहिला तर हा देश उभा राहिलेला दिसतो. या देशात अनेक योजना, प्रकल्प दिसत आहेत. देशाची अर्थव्यवस्था आपण पाहिली. त्याच मागच्या पुण्याईवर आजही देश तरलेला आहे, मागची सात वर्षेसुद्धा…हे कोणालाही नाकारता येणार नाही,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

“अजित पवारांनी तोंड सांभाळून बोलावं”
“अजित पवार यांनी भाजपावर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल. झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करुन मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होतं, ही गोष्ट लक्षात राहत नाही,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लगावला.

“….तर अजित पवार आणि शरद पवारांच्या मागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेन”
“संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे, पण त्यांची कृती सरकारला सहकार्य करण्याची, कोविडमुळे शांत बसण्याची असेल तर ती आम्हाला मान्य नाही. सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण मिळवण्याची संभाजीराजेंची भूमिका असेल तर आम्ही खांद्याला खांदा लावून आहोत. संघर्ष करुन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका शरद पवार, अजित पवारांची जरी असेल तर त्यांच्या मागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेन,” असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जाहीर केलं.