राज्यात अद्यापही सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नसून राष्ट्रपती राजवट लागू होण्याचं संकट निर्माण झालं आहे. शिवसेना ५०-५० च्या फॉर्म्यूलावर ठाम असून मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा हा सत्तासंघर्षातील कळीचा मुद्दा ठरला आहे. शिवसेना सत्तास्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचं समर्थन घेऊ शकतं अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन रामजन्मभूमी आणि सावरकरांबद्दलची भूमिका बदलता येईल का अशी विचारणा शिवसेनेला केली आहे. तसंच सत्तास्थापनेचा तिढा लवकर सुटेल असा विश्वसाही त्यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी सुनील महादेव ओमासे आणि नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

आणखी वाचा- राज्यातील शेतकरी सुखी व्हावा; चंद्रकांत पाटील यांचे विठ्ठल चरणी साकडे

यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “यावर्षी राज्यासमोर अनेक आव्हानं आली. सुरुवातीला दुष्काळ स्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही मदत मागितली आहे”.

बेडग गावचे ओमासे ठरले मानाचे वारकरी
मानाचा वारकरी ठरलेले सुनील ओमासे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील आहेत. शेतकरी कुटुंबातील ओमासे २००३ पासून वारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना चांदीची विठ्ठल रुक्मिणी मुर्ती, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना मोफत एसटी पासही देण्यात आला.