गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी भीमा-कोरेगावच्या प्रकरणात योग्य काळजी घेतली नाही. सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच ही घटना घडली आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केली. भीमा-कोरेगाव प्रकरणाचे राजकारण करून मढय़ावरचे लोणी खाणे सरकारने बंद करावे, रामदास आठवले भाजपशी संलग्न आहेत, ते माध्यमांसमोर वेगळेच बोलत आहेत, माध्यमांपेक्षा त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की, नाही याचा जाब विचारावा, असा सल्लाही मुंडे यांनी आठवले यांना दिला आहे.

हिंगोली येथे राष्ट्रवादी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती नसलेल्या भाजपच्या श्याम जाजू यांनी त्यांच्या बद्दल बोलू नये, सामाजिक तेढ निर्माण करणे, महापुरुषांच्या नावाने मतभेद निर्माण करणे, जातीपातीत भांडणे लावणे हेच भाजपच्या लोकांचे मागील साडेतीन वर्षांतील काम आहे. मात्र आमच्या दैवताच्या वंशजांबद्दल असे बोलणे कदापीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला, तर यापूर्वी यवतमाळ ते नागपूर अशी दिंडी यात्रा काढल्यामुळे सरकारला कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे व घाई-घाईत अर्धवट पैसे खात्यावर जमा करणे भाग पडले.

१६ जानेवारीपासून तुळजापूर येथून हल्लाबोल यात्रेला प्रारंभ होणार आहे. ही यात्रा ९ दिवसात २६ ठिकाणी सभा घेऊन समारोप औरंगाबाद येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढून ३ फेब्रुवारीला होणार आहे. या यात्रेमध्ये मराठवाडय़ातील शेतकरी, व्यापारी, तरुण, महिला यांच्याकडून विविध स्थानिक प्रश्न जाणून घेतले जाणार आहेत.

यावर सरकार विरुध्द वज्रमूठ आवळली जाणार असल्याचे ते म्हणाले. िहगोली जिल्ह्णाात २२ जानेवारी रोजी दोन ठिकाणी सभा घेतल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.

मेळाव्यात हल्लाबोल यात्रेसंबंधीची तयारी

पत्रकार परिषदेपूर्वी मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हल्लाबोल यात्रेसंबंधी मार्गदर्शन केले. या वेळी पक्षाचे सरचिटणीस बसवराज पाटील, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आ. रामराव वडकुते, दिलीप चव्हाण यांची भाषणे झाली. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी, महिला जिल्हाध्यक्षा सुमित्रा टाले, प्रदेश सचिव सोनाली देशमुख, जिल्हाध्यक्ष मुनिर पटेल, जि. प. चे कृषी सभापती प्रल्हादराव राखोंडे, जिल्हा सरचिटणीस बी. डी. बांगर आदी कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन जि. प. सदस्य संजय दराडे यांनी केले.