तान्हाजी चित्रपटाच्या दृश्यांचा वापर केलेला एक व्हिडिओ कोणीतरी पोलिटिकल कीडा नावाच्या ट्वीटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला तरी त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. भाजपा त्या व्हिडिओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरही करत नाही. भाजपा या व्हिडिओचा निषेध करत आहे. या व्हिडिओवरून भाजपाला जाब विचारणे अत्यंत चुकीचे आणि खोडसाळपणाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, अशी भाजपाची भूमिका आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच तान्हाजी सिनेमातील एक प्रसंग मॉर्फ करून व्हायरल करण्यात आला आहे. या प्रसंगात शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, सोशल मीडियाच्या बाबतीत कोण काही व्हिडिओ बनवून व्हायरल करेल यावर कोणाचा निर्बंध असू शकत नाही. हा वादग्रस्त व्हिडिओ अशाच प्रकारे कोणीतरी व्हायरल केला. भाजपाच्या बाबतीत संशय निर्माण करून टीका करण्याचा विषय तयार करण्याचा डाव त्यामागे दिसतो.
जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागतात त्यांना छत्रपतींच्या बाबतीत बोलायचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. ते एक अद्वितीय ऐतिहासिक राजे होते आणि असे कर्तबगार राजे पुन्हा होणे नाही. त्यांच्या कर्तृत्वामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही.