काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपाने शिवसेनेच्या मदतीने जिल्हा परिषदांमध्ये सत्ता थापन केली आहे.  शिवसेना मदतीला धावून आल्याने सांगली, कोल्हापूरमध्ये भाजपाचे कमळ फुलले, तर सोलापूरमध्ये भाजपा पुरस्कृत आघाडीला सत्ता मिळाली. कालअखेर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत जाण्याचे मनसुबे जाहीर करणाऱ्या सेनेने रात्रीत आपले निर्णय बदलून महायुतीला पाठबळ देण्याची भूमिका घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रात युती अभेद्य असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. दरम्यान अपेक्षेप्रमाणे पुणे आणि सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी तर नगरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

सांगलीत सेनेचे ३, कोल्हापुरात १० तर सोलापुरात ५ सदस्य आहेत. सांगली कोल्हापूरमध्ये सेनेला उपाध्यक्षपद मिळाले. भाजपासोबत जाण्यावरून सांगलीत सेनेत खळखळ माजली नसली, तरी कोल्हापुरात मात्र सेनेत ३ सदस्यांनी काँग्रेससोबत राहण्याची भूमिका कायम ठेवली असली, तरी सत्तेच्या परिघातच सेना राहिली आहे.

सोलापूरमध्ये राष्ट्रवादीमधील हाराकिरीच भाजपाच्या मदतीला आली. नेमक्या याच गटबाजीचा लाभ उठवीत भाजपाने पुरस्कृत उमेदवारांच्या माध्यमातून सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यात सत्तेपासून रोखण्यात यश मिळविले. याला आमदार बबनराव िशदे यांचे बंधुप्रेम भाजपाच्या मदतीला आले.

मात्र ६८ जागांच्या जिल्हा परिषदेत सर्वाधिक २६ जागा राष्ट्रवादीच्या स्वतच्या असतानाही कागदोपत्री ४२ सदस्यांचे संख्याबळ असतानाही शेकापच्या ३ सदस्य असणाऱ्या गटाला अध्यक्षपदाचा उमेदवार द्यावा लागला. मात्र अखेर सभागृहात पराभव होण्याची चिन्हे स्पष्ट होताच राष्ट्रवादीने सपशेल माघार घेत भाजपाला पुढे चाल दिली.

पुण्यात राष्ट्रवादी

पुणे आणि सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी सहज विजय प्राप्त केले. या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये पक्षाचे निर्विवाद बहुमत आहे. नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून विखे यांना दूर ठेवण्याच्या खेळीला अपेक्षित यश न मिळाल्याने तसेच काँग्रेसमधीलच थोरात गटाने पक्षविरोधी भूमिका घेण्याचे ऐनवेळी टाळल्याने अखेर अध्यक्षपदाची माळ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनीताई विखे यांच्या गळय़ात पडली.