शिवसेनेनं सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेतील संबंध कमालीचे ताणले गेलेत. मात्र शिवसेना आमदार आणि नेते प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना युतीसाठी पत्र लिहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या लेटर बॉम्बनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर शिवसेना आणि भाजपा नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया येत आहेत. त्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना युतीसाठी खुणावलं आहे. त्यांनी सकारात्मक विचार केल्यास आमचे नेतेही विचार करतील असं त्यांनी सांगितलं.

“प्रताप सरनाईक हे त्यांचे नेते आहेत. आमदार आहेत. उद्धवजींनी त्यांच्या विनंतीचा विचार केला, तर आमचे नेतेही वर बसलेले आहेत. तेही विचार करतील. आता प्रताप सरनाईक यांना वाटतंय. तेच आम्ही १८ महिन्यांपूर्वी घसा फोडून सांगत होतो. त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेबांनी आयुष्य घालवलं. त्यांच्याबरोबर सत्तेत का बसता? हेच आम्ही सांगत होतो.”, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

“संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्यावं”, शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं उद्धव ठाकरेंना पत्र!

प्रताप सरनाईक यांनी या पत्रामध्ये युती तुटल्यानंतरही नेत्यांचे संबंध चांगले असल्याचं नमूद केलं आहे. “पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. राज्यात आपली युती तुटल्यानंतरही नेत्यांचे वैयक्तिक संबंध जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल”, असं देखील या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

प्रताप सरनाईक जेलचे पाहुणे होणारच; सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर सोमय्यांचा इशारा

काँग्रेस राष्ट्रवादीला मोठं करण्यासाठी आपण आघाडी केली का? असा प्रश्न प्रताप सरनाईक यांनी विचारला आहे. “काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं त्या पक्षांच्या लोकांना वाटत आहे. काँग्रेसनं एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र आहे. महाविकासआघाडीतले काही मंत्री-नेते केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठिशी लागू नये, म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासोबत छुपी हातमिळवणी करत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामं लगेच होता, पण आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेनेच्या आमदारांची होत नाहीत”, अशी तक्रार देखील प्रताप सरनाईक यांनी केली आहे.