News Flash

माझे सरकार, माझी स्थगिती… अन् रोज फजिती!!! भाजपा नेत्याने उडवली ठाकरे सरकारची खिल्ली

कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणावरून साधला निशाणा

कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. उद्धव ठाकरे सरकारसाठी हा मोठा दणका मानला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ‘एमएमआरडीए’ला काम थांबवण्याचे आदेश दिले असून भूखंड आहे त्या स्थितीत ठेवण्यास सांगितलं. यासोबतच जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली. या निर्णयानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी ठाकरे सरकारवर टीका करत त्यांची खिल्ली उडवली.

‘उद्धव ठाकरे सरकारचं वैशिट्य काय? देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांना स्थगिती देणे. अशा सरकारने घेतलेल्या मनमानी निर्णयांची कोर्टाकडून फजिती होते’, अशा शब्दात भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी उद्धव ठाकरे यांची विविध विषयांवरून एकाच ट्विटमध्ये खिल्ली उडवली. “माझा पेपर, माझी मुलाखत… इतरांची कशाला आफत? Facebook Live वर माझी बांग… मेरे बाप की एकही टांग! माझे सरकार, माझी स्थगिती… रोज कोर्टाचा बांबू आणि रोज फजिती !!!”, असं ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांचं सरकार याच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

कांजूरमार्ग कारशेड स्थगिती मुद्द्यावरून भाजपाच्या अनेक नेत्यांनी भाष्य केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर ठाकरे सरकारला सल्लादेखील दिला. “विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी काम हे केलं पाहिजे. मेट्रोच्या कामासाठी लागणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचं काम त्वरित सुरू न केल्यास प्रकल्प २०२४ पर्यंत लांबेल. अशा परिस्थितीत राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे? या कामात जेवढा उशीर होईल तितकं नुकसान होईल. गेलं वर्षभर हे काम रखडलं आहे. त्यामुळे आता आरेमध्ये तात्काळ कारशेडचं काम सुरू करण्यात यावं,” असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 5:23 pm

Web Title: bjp leader shivaray kulkarni slams shivsena uddhav thackeray ajit pawar government vjb 91
Next Stories
1 ज्याला मेसेज येणार त्याला मिळणार करोनाची लस-राजेश टोपे
2 “तुम्ही दगडावर कितीही डोकं आपटलं, तरी…”; अजित पवारांना मुनगंटीवारांचं आव्हान
3 वर्ध्यात मुथूट फिनकॉर्पवर दिवसाढवळ्या दरोडा; साडेतीन किलो सोनं लूटून दरोडेखोर पसार
Just Now!
X