जिल्हा परिषद अध्यक्षांना बदलण्याच्या मागणीने जोर

दिगंबर शिंदे, सांगली

सांगलीवर भाजपाने गावपातळीवरच्या ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषद, महापालिकेवर सत्ता काबीज करीत कमळ फुलविले. ज्या आयाराम-गयारामच्या जिवावर हे कमळ फुलले तेच काटे आता कमळाला रक्तबंबाळ करतात की या काटय़ांनाच निस्तेज करण्याचे औषध मारले जाते हे येणारा काळ सांगेल. मात्र, सध्या तरी या मागणीला मुंबईतून काडीचे महत्त्व दिले जाणार नाही असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जिल्हा परिषदेत नेतृत्वबदलाची भाजपाच्या २५ पकी ११ सदस्यांनी जाहीर मागणी केली असली तरी यामागे जिल्हा बँकेतील एका उद्योगाच्या कर्जप्रकरणाचा गंध असल्याचीही चर्चा आहे.

जिल्हा परिषदेमध्ये सध्या भाजपची सत्ता असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे बंधू संग्रामसिंह देशमुख अध्यक्ष आहेत. ६० सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजपची सदस्य संख्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची सदस्यसंख्या समान – प्रत्येकी २५ आहे. उर्वरित  १० सदस्य हे वेगवेगळ्या विचारधारांचे आहेत. सत्ता स्थापनेवेळी इच्छुकांना संधी देण्याच्या बोलीवर भाजपने अध्यक्षपदाची शर्यत जिंकली होती. त्या वेळी सव्वा वर्षांची संधी देण्याचे धोरण निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सव्वा वर्ष झाले तरी पदाधिकारी बदलाची मागणी दुर्लक्षित करण्यात येत असल्याने सध्या बंडाचे निशाण हाती घेतले आहे. प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा हक्क आहे त्याप्रमाणे इच्छा व्यक्त केली तर त्यात गटबाजी कोठे आहे, असा दावाही पक्षाकडून केला जाईल. तथापि, हा दावा केला जात असताना गेल्या काही दिवसांतील हालचालींचा विचार करणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळीही घडलेले नाटय़ या मतभेदाच्या मुळाशी आहे. अध्यक्षपदासाठी देशमुखांनी उमेदवारी दाखल केली. त्या वेळी तासगावचे ज्येष्ठ सदस्य डी. के. पाटील यांच्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी आग्रह धरला होता. मात्र, या नावाला पािठबा देणाऱ्या अनिल बाबर यांचा विरोध होता. शिवसेनेचे तीन सदस्य बाजूला गेले तर बहुमताचे गणित जमत नव्हते. यामुळे खासदार गटाकडून शिवाजी ऊर्फ पप्पू डेंगरे यांची उमेदवारी दाखल करण्यात आली होती. अखरेच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून डोंगरेंची उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले होते. त्या वेळी खासदार गटाने दोन पावले मागे घेतली होती.

सध्या अध्यक्षपद पहिली अडीच वष्रे खुल्या गटासाठी असल्याने पुन्हा ही संधी मिळणे अशक्य असल्याने अस्वस्थ झालेल्या खासदार गटाने उचल खाल्ली असून जर पदाधिकारी बदलामध्ये मित्रांकडून दगा-फटका झाला तर ही कुमक राष्ट्रवादीतून पुरविली जाऊ शकते. तशी तजवीज करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळविली. यानंतरच जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाच्या मागणीने जोर धरला आहे. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाला यश मिळाले. एक खासदार, चार आमदार, जिल्हा परिषदेपाठोपाठ महापालिका काबीज करूनही जिल्ह्य़ाचा सत्तेतील अनुशेष कायम राहिला. मंत्रिपद देण्यात पक्षाने हात अखडता धरला. यामागे खासदारांची राजकीय खेळी असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. याच दरम्यान, खासदारांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद आणि कॅबिनेट दर्जा मिळाला. या सर्व बाबींचा विचार करता जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलामागे वर्चस्ववादाची लढाई असल्याचे दिसून येते.

खासदार संजयकाका आणि पक्षाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात मतभेद आहेत. या मतभेदामागे वालचंद महाविद्यालयावर ताबा कोणाचा हे एकमेव कारण नाही तर जिल्हा नेतृत्वासाठीचा संघर्ष आहे. वसंतदादांच्या पश्चात डॉ. पतंगराव कदम आणि आ. जयंत पाटील यांच्यात हा सुप्त संघर्ष होता तरी त्यांनी कधीही टोकाचा संघर्ष केला नाही. मात्र शिस्तबद्ध भाजपमध्ये हा सत्तासंघर्ष आज टोकाच्या पातळीवर पोहचला आहे. एका व्यासपीठावर ही मंडळी येतात, एकमेकावर स्तुती सुमने उधळली जातात, पडद्याआड मात्र राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही.

जिल्ह्य़ातील राजकीय वाद कायम तेवत राहिला पाहिजे अशीच पक्षाचीही भूमिका सध्या तरी दिसत आहे. लोकसभेसाठी खा. संजयकाका पाटील हेच भाजपाचे उमेदवार असतील असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. मात्र, काकांचे मन दिल्लीपेक्षा सांगलीत जास्त रमत असल्याने भाकरी परतण्याची वेळ आलीच तर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, दीपक िशदे, अजितराव घोरपडे यांच्या नावांचा पर्याय म्हणून विचार होऊ शकतो. यामुळे देशमुखांच्या गढीचाच विचार दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील मनसबदारीसाठी होऊ शकतो. आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना विधानसभेसाठी मदानात उतरविण्याची तयारी आहे. या खेळीला शह देण्याचा प्रयत्नही यामागे असू शकतो. तसेच जिल्हा बँकेत देशमुख उपाध्यक्ष आहेत, त्यांच्यावर एका कर्जप्रकरणासाठी दबाव आणण्याचाही या मागे प्रयत्न असू शकतो.  काँग्रेस-राष्ट्रवादीतून या बंडाळीकडे फारशा गांभीर्याने पाहत नसली तरी ,निवडणूक झाली तर महापालिका निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी सोडण्याची संधीही सोडणार नाही. सत्तेच्या परिघात पक्षनिष्ठा, नेतृत्वनिष्ठा या बाबी गौण असतात हे या निमित्ताने दिसले तर वावगे ठरणारे नसेल.

जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाची मागणी करणे गर आहे असे म्हणता येणार नाही. मात्र, यासाठी जिल्हाध्यक्षांना रीतसर निवेदन द्यायला हवे होते. तरीही याबाबतच्या घडामोडीची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे. त्यांनी याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल असे सांगितले असून आ. विलासराव जगताप यांच्याशी बोलणी झाली आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आदेश आल्यानंतर पुढील कृती केली जाईल.

– पृथ्वीराज देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष