राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
“मदिरालये उघडण्यास परवानगी देणाऱ्या महाआघाडी सरकारने मंदिरे उघडण्यास मात्र अजून परवानगी दिलेली नाही. या विरोधात १३ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन केले जाईल. भाजपच्या प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात संत, महाराजांच्या बरोबर मंदिरांवर उपजीविका अवलंबून असणारी छोटी व्यावसायिक मंडळीही सहभागी होणार आहेत,” असे उपाध्ये यांनी सांगितले.
अत्याचारांमध्ये वाढ
“महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला, तरुणी, बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री या अत्याचारांची गंभीरपणे दखल घेत नाहीत. म्हणूनच या असंवेदनशील सरकारच्या विरोधात १२ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे,” असं चित्रा वाघ म्हणाल्या. तर १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी सांगितले.
कृषी कायद्यांसाठी आनंदोत्सव
याच बरोबर मोदी सरकारने केलेल्या ३ कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी राज्यभर आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ १२ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील वरवंड ते चौफुला अशी ट्रॅक्टर यात्रा काढून होणार आहे. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी होणार आहेत, अशी माहितीही उपाध्ये यांनी बोलताना दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 10, 2020 4:51 pm