काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजपानं आक्रमक भूमिका घेतली. नागपूर येथे सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा आमदारांनी ‘मी पण सावरकर’ असलेल्या टोप्या घालून विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपानं यावेळी केली.

हिवाळी अधिवेशनात प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजपा सरकारला कोडींत पकडण्याचे संकेत अगोदरच मिळाले होते. आज कामकाजाला सुरूवात होण्याआधीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आमदार ‘मी पण सावरकर’ उल्लेख असलेल्या टोप्या परिधान करून विधिमंडळ परिसरात दाखल झाले. त्यानंतर विधान सभा आणि विधान परिषदेच्या प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यांवर भाजपा आमदारांनी निदर्शनं केली.

यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा भाजपा आमदारांनी धिक्कार केला. राहुल गांधी, सोनिया गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपा आमदारांनी घोषणाबाजी केली. याचबरोबर अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपये मदत देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणीही भाजपानं केली.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसनं देश बचाओ रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. “संसदेत भाजपावाले म्हणाले, भाषणासाठी तुम्ही माफी मागा. मात्र, जे खरं आहे त्यासाठी माझ्याकडून माफी मागितली जात होती. माझं नाव राहुल सावरकर नाही. माझं नाव राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. काँग्रेसमधील कोणतीही व्यक्ती माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदींना आणि त्यांचे असिस्टंट अमित शाह यांना देशाची माफी मागावी लागेल,” असं राहुल गांधी म्हणाले होते.