|| वसंत मुंडे
बीड : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी नागपुरात जाऊन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. त्यांच्यामध्ये तासभर चर्चा झाल्याने भेट लक्षवेधी झाली आहे. तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही थेट दिल्लीत जाऊन महाराष्ट्रातील नवीन मंत्र्यांचे स्वागत केले. मुंडे भगिनी समर्थकांच्या नाराजी नाट्यात विद्यमान आमदार व काही पदाधिकाऱ्यानी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या दोन नेत्यांनी स्वतंत्रपणे थेट पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्याने भाजप अंतर्गत नेतृत्वाच्या नव्या वाटा शोधल्या जाऊ लागल्या आहेत.

बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलून केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांना संधी मिळाली. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नाराज समर्थकांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले. मात्र पक्ष नेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर पंकजा यांनी समर्थकांना मुंबईत बोलावून समजावले. आपले नेते मोदी, शहा आणि नड्डा असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानत नसल्याचेच स्पष्ट केले. प्रदेश पातळीवरील नेत्यांनीही मुंडे समर्थकांच्या नाराजी अस्त्राकडे दुर्लक्ष करून योग्य तो संदेश दिला. परिणामी मुंडे समर्थक जिल्ह्यातील विद्यमान तीन आमदारांपैकी एकही आमदार अथवा प्रमुख पदाधिकारी नाराजांच्या बैठकीत दिसला नाही. त्यामुळे मुंडे भगिनींचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात पक्षाच्याच नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली असून काही नेत्यांनी थेट पक्षातील इतर नेत्यांच्या भेटी घेत नव्या वाटा शोधायला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी थेट नागपुरात जाऊन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन बीड ते नगर रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी केली. गडकरी आणि धस यांच्यात तब्बल एक तास विकासावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर सुरुवातीला भाजपात असलेले सुरेश धस यांचे गडकरी यांच्याशीही चांगले संबंध आहेत.

Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र

धस-मुंडे विसंवाद

अलीकडे काही दिवसांपासून मुंडे भगिनी आणि सुरेश धस यांच्यातील विसंवाद लपून राहिला नाही. पक्षाने ऊसतोड कामगारांच्या संपात धस यांच्याकडे नेतृत्व दिल्यापासून पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील अंतर्गत संघर्ष वाढला. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासह इतर मागण्या घेऊन आमदार धस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून पक्षात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंडे वगळता भाजपात पहिल्यांदाच धस यांनी मोर्चा काढून पक्षातील आपली दिशा स्पष्ट केली असून पक्ष नेतृत्वाकडून धस यांना पाठबळ असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे मुंडे भगिनी समर्थक नाराजांचे मुंबईत रणकंदन सुरू असताना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी थेट दिल्लीत जाऊन नवीन मंत्र्यांचे स्वागत केले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्यासह केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्यामुळे पोकळेंच्या भेटीला पक्षांतर्गत महत्त्व आले आहे. पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाचे संकेत लक्षात घेऊन पक्षातील मुंडे समर्थक असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती या पाश्र्वाभूमीवर काहींनी नेतृत्वाच्या नव्या वाटा शोधायला सुरुवात केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.