सत्तेत राहून नेहमी विरोधकांच्या भूमिकेत असणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची की नाही यासाठी भाजपाने शिवसेनेला डेडलाइन दिली आहे. भाजपाने 31 जानेवारीपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचार करुन आपला निर्णय कळवण्यास सांगितलं असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भाजपा शिवसेनेच्या निर्णयाची वाट पाहत आहे. शिवसेनेकडून वारंवार टीका होत असतानाही भाजपाने मात्र सबुरीची भूमिका घेतली होती. पण अखेर भाजपाने आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलं आहे. दिल्लीत बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील भाजपा खासदारांची बैठक पार पडली. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेच्या अवास्तव मागण्या मान्य करण्यासाठी पक्ष झुकणार नसल्याचं स्पष्ट केलं. यासोबतच शिवसेनेच्या निर्णयाची ठराविक वेळेपर्यंतच वाट पाहू असंही सांगितलं.

महाराष्ट्रात युती करायची असेल तर काही गमावून करणार नाही असं अमित शाह यांनी ठणकावून सांगितलं आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवण्याचीही भाजपाची तयारी आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. या बैठकीत शाह यांनी खासदारांना निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीत नारायण राणेही उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक असून ही भाजपाची अंतिम भूमिका असल्याचं समजत आहे. भाजपा महाराष्ट्रात शिवसेनेला बिहारमध्ये जनता दलाला दिली होती तशी ऑफर देणार नाही हे स्पष्ट आहे. बिहारमध्ये आपल्या 22 लोकसभा जागा असतानाही भाजपाने जनता दलाशी युती करण्यासाठी 17 जागांवरच लढण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रात मात्र भाजपा 2014 मध्ये जिंकलेल्या सर्व जागांवर लढण्यास इच्छुक आहे. कदाचित त्यापेक्षा जास्त जागाही ते लढवू शकतात.

युतीचे काय होणार हा प्रश्न अद्यापही कायम आहे. लोकसभा निवडणुकांसाठी आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी युती होणार की नाही? हा पेच कायम आहे. पंढरपूरला झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी युतीचा निर्णय जनताच घेईल असे म्हटले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमच्यासोबत येईल कारण आम्ही आणि ते समविचारी पक्ष आहोत असे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या विविध मुलाखतींमध्ये म्हटले आहे. त्यामुळे युती होणार की नाही हा पेच सध्या तरी कायम आहे.