दिल्लीतील संस्थेची पाहणी अंतिम टप्प्यात

मोहन अटाळकर, अमरावती</strong>

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेत युतीची चर्चा सुरू असली तरी पश्चिम विदर्भातील सर्व ३० विधानसभा मतदारसंघात भाजपने स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. या मतदारसंघांमध्ये दिल्लीतील एका संस्थेच्या माध्यमातून पाहणी सुरू झाली आहे. पक्षाचा ही दुसरी पाहणी असून, ती अंतिम टप्प्यात आहे.

पश्चिम विदर्भातील तीसपैकी तब्बल १८ मतदारसंघ सध्या भाजपकडे आहेत. शिवसेनेचे केवळ तीन आमदार आहेत. येत्या निवडणुकीत यापेक्षाही जास्त जागा निवडून येतील, असा आत्मविश्वास वाटत असल्याने त्या दृष्टीने भाजपने पुढची गणिते आखण्यास सुरुवात केली आहे. पंधरा दिवसांपासून या मतदारसंघांत दिल्लीतील एका संस्थेमार्फत पाहणी सुरू झाली आहे. पहिली पाहणी तीन महिन्यांपूर्वीच झाली होती. या पाहणीतील निष्कर्षांच्या आधारे भाजपकडून उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपने स्वबळाची चाचपणी सुरू केल्याने सत्तेत सहभागी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांत अस्वस्थता पसरली आहे.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पश्चिम विदर्भातून मार्गक्रमण करीत असताना पश्चिम महाराष्ट्रातील महापुरामुळे मध्येच मुख्यमंत्र्यांना त्याकडे लक्ष केंद्रित करावे लागले. त्यामुळे अनेकांना भाजपमध्ये प्रवेश करता आला नाही. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी आता गणेशोत्सवात भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे कळते.

पश्चिम विदर्भात गेल्या विधानसभा निवडणुकीत सहा जागांवर भाजप दुसऱ्या स्थानी तर पाच जागांवर शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. सेनेला आठ जागी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असली, तरी चार जागांवर शिवसेनेचे उमेदवार हे पाचव्या ते सातव्या क्रमांकावर फेकले गेले. त्यामुळे या जागांवर शिवसेनेला उजर राहिलेला नाही, अशी चर्चा आहे.

अमरावती जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी शिवसेनेला केवळ बडनेरा मतदारसंघातच दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली  होती. उर्वरित मतदारसंघांमध्ये चौथे किंवा पाचवे स्थान मिळाले होते. त्यामुळे शिवसेनेला जागांचा आग्रह करताना दमछाक होणार आहे. अकोला जिल्ह्यातही भाजपचेच वर्चस्व आहे. येथे शिवसेनेला एकही जागा मिळाली नव्हती. शिवसेनेचे उमेदवार तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर होते. बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व आहे. पण, या दोन्ही जिल्ह्यात शिवसेनेला पक्षविस्तारासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. वाशीम जिल्ह्यात भाजपच्या वर्चस्वाला शह देणे शिवसेनेसाठी सहजसोपे नाही, अशा स्थितीत स्वबळावर लढल्यास भाजपचा अधिक फायदा असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी ठिकठिकाणी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू आहे.

युतीसाठी प्रयत्न

लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीचा निर्णय घेतला. परिणामी दोन्ही पक्षांना अभूतपूर्व यश मिळाले. विधानसभा निवडणूक देखील एकत्रितपणे लढली जावी, अशी दोन्ही पक्षांतील नेत्यांची इच्छा आहे. वरिष्ठ नेते लवकरच यासंदर्भात निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.

– शिवराय  कुळकर्णी, प्रवक्ते, भाजप.