29 September 2020

News Flash

रायगडमध्ये एसटीत बॉम्ब

रायगड पोलिसांच्या बॉम्बनाशक पथकाने गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास बॉम्ब निकामी केला.

कर्जतहून आपटा येथे वस्तीला आलेल्या एसटी बसमध्ये बुधवारी रात्री अकराच्या सुमारास बॉम्ब आढळला.

जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा; ‘एटीएस’मार्फत तपास सुरू

अलिबाग : कर्जतहून आपटा येथे वस्तीला आलेल्या एसटी बसमध्ये बुधवारी रात्री अकराच्या सुमारास बॉम्ब आढळला. रायगड पोलिसांच्या बॉम्बनाशक पथकाने गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास बॉम्ब निकामी केला.

हा आयईडी बॉम्ब होता, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आपटा येथे एसटी बस रात्री वस्तीसाठी थांबल्यानंतर वाहकाने केलेल्या तपासणीदरम्यान त्यात पांढऱ्या रंगाची पिशवी आढळली. पिशवीत बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने त्यांनी याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. रसायनी पोलिसांनी तपासणी करून अलिबागमधून बॉम्बनाशक पथकाला पाचारण केले.

पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह रायगड पोलिसांचे श्वानपथक, न्यायवैद्यक पथकही तातडीने घटनास्थळी आले. या पांढऱ्या पिशवीची तपासणी केली असता त्यात बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मध्यरात्री बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू झाले. पहाटे ४ च्या सुमारास बॉम्बनाशक पथकाने बॉम्ब निकामी केल्याने अप्रिय घटना टळली.

याबाबतचे वृत्त परसताच रायगडमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी गुरुवारी सकाळी प्राथमिक तपास करून बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सर्व वस्तू तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवल्या आहेत. रायगडमध्ये पोलिसांसह एटीएसच्या  सार्वजनिक वाहने, खासगी वाहने आणि गर्दीच्या ठिकाणी कसून तपासणी सुरू केली आहे.

जुळणी प्रशिक्षित गुन्हेगारांकडून

मुंबई : पनवेल तालुक्यातील आपटा गावात एसटीत सापडलेला बॉम्ब आयईडी(इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) असून त्याची जुळणी एखाद्या प्रशिक्षित व्यक्तीने केल्याच्या निष्कर्षांर्प्यत तपास यंत्रणा पोहोचल्या आहेत. रायगड पोलिसांसह राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) या प्रकरणी तपास करत आहे.

बॉम्बनाशक पथकाने निकामी केलेल्या बॉम्बमध्ये पांढऱ्या रंगाची दाणेदार भुकटी, घरगुती वापरातील बॅटरी सेल, खिळे, पीसीबी सर्किट आणि इंडस्ट्रियल डिटोनेटरची अचूक जुळणी आढळली. यातील पांढरी भुकटी अमोनियम नायट्रेट किंवा युरीयामिश्रित असावी, असा अंदाज आहे. या बॉम्बचा स्फोट दूरनियंत्रकाद्वारे करता येईल, अशी त्यांची जुळणी करण्यात आली होती. निकामी केल्यानंतर हे सुटे भाग, भुकटी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.

ही एसटी पहाटे कर्जतकडे प्रवास करणार होती. ती प्रवाशांनी पूर्ण भरल्यावर स्फोट घडवून आणण्याचा गुन्हेगारांचा हेतू होता की कर्जत-आपटादरम्यान कुणा व्यक्तीच्या हाती बॉम्ब दिला जाणार होता की बॉम्बची चाचणी घेतली जाणार होती, या दृष्टीने तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे.

काशिमिरा स्फोटाचीही चौकशी

काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी रस्त्यावर झालेल्या स्फोटाची चौकशीही एटीएसकडून सुरू आहे. घटनास्थळावरून काही साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. फटाक्यांच्या दारूचा वापर त्यात करण्यात आला असावा, असा अंदाज आहे.

एसटी बसमध्ये सापडलेला बॉम्ब आमच्या पथकाने सुरक्षितपणे निकामी केला आहे. हा बॉम्ब कशापासून बनवला, हे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकेल.

-अनिल पारस्कर,पोलीस अधीक्षक, रायगड

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 3:55 am

Web Title: bomb found in st bus in raigad
Next Stories
1 Election 2019 : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये गटबाजीची डोकेदुखी
2 शरद पवार यांची माढय़ातून उमेदवारी जाहीर
3 पोलीस उपनिरीक्षकाचा पोलिसावर जीवघेणा हल्ला
Just Now!
X