शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पहिल्याच दौ-यावर रुसलेल्या भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला. मात्र काँग्रेसचे काही नगरसेवक तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लोखंडे यांची भेट घेऊन सत्कारही केला. एकूणच पहिलाच दौरा चांगलाच गाजला.विजयानंतर लोखंडे प्रथमच आज शहरात आले. विधानसभेचे इच्छुक उमेदवार व साहित्यिक लहू कानडे हे शहरात स्थायिक झाले असून त्यांच्या घरभरणी व सत्कार समारंभास लोखंडे उपस्थित राहिले. त्यांनी धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. सरकारी विश्रामगृहावर त्यांनी काही लोकांचा सत्कार स्वीकारला. त्यांच्या समवेत भय्या गंधे, श्रीकांत साठे, सेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुकाप्रमुख देवीदास सोनवणे, अशोक थोरे आदी उपस्थित होते. मात्र महायुतीचे घटकपक्ष असलेले भाजप, रिपब्लिकन पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे कार्यकर्ते अनुपस्थित होते. त्यांनी दौ-यावर बहिष्कार टाकला. दौ-याची माहिती या कार्यकर्त्यांना देण्यात आली नव्हती. तसेच त्यांना सहभागी करून घेण्यात आले नव्हते. सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी महायुतीच्या घटक पक्षांना जाणीवपूर्वक दूर ठेवले. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला. लोखंडे यांनी मात्र आपण गटबाजीला महत्त्व देत नाही, दौ-याच्या नियोजनात चूक झाली ती दुरुस्त केली जाईल, घटकपक्षांची नाराजी दूर करू असे लोखंडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. महायुतीचे घटकपक्ष दौ-यात सहभागी झाले नसले तरी राष्ट्रवादीचे युवा नेते सिध्दार्थ मुरकुटे यांनी त्यांची सरकारी विश्रामगृहामध्ये भेट घेतली. तसेच लोखंडे यांच्या दौ-यात ते काही काळ सहभागी झाले. त्यांची उपस्थिती नजरेत भरणारी होती. मुरकुटे यांनी आपली भेट राजकीय नव्हती, पण लोखंडे खासदार झाले, विकासाच्या कामाकरिता त्यांची भेट घेतली असा खुलासा केला. मुरकुटे यांनी खुलासा केला असला तरी त्यांची छुपी मदत लोखंडे यांना झाली होती. काँग्रेसचे नगरसेवक सलीम शेख, महमंद शेख यांच्या निवासस्थानी जाऊन लोखंडे यांनी त्यांची भेट घेतली. सत्कार स्विकारला. काँग्रेसच्या शहरातील काही प्रमुख नेत्यांनीही लोखंडे यांची भेट घेतली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार जयंत ससाणे तसेच आमदार भाऊसाहेब कांबळे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.मुस्लिम समाज मोठय़ा संख्येने असलेल्या सुभेदारवस्ती भागात लोखंडे यांना फ़ारच कमी मते मिळाली होती. या भागात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना ५ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. पण विजयानंतर राजकीय कटुता न ठेवता लोखंडे यांनी सुभेदारवस्ती भागातील काही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून साहित्यिक कानडे उत्सुक आहेत. सेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारीचा शब्द दिला आहे. पण माजी मंत्री बबनराव घोलप यांचे चिरंजीव योगेश हेदेखील इच्छुक आहेत.  घोलप यांनाही दौ-यापासून दूर ठेवण्यात आले.