प्रशांत देशमुख 

करोना बळीच्या अंत्यसंस्काराचे पैसे बेकायदेशीरपणे उकळले जात असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. पालिका मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार करोना आजाराशी संबंधित उपाययोजना करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधीची गरज भासत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने वित्त आयोगाकडून प्राप्त निधीवरील व्याजाच्या रक्कमेतून खर्च करण्याची मुभा दिली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या मदत व पुनर्वसन विभागातर्फेही या संस्थांना मदत मिळते. त्यातूनच प्रतिबंधात्मक उपाय केले जातात. प्रतिबंधक क्षेत्राचे व्यवस्थापन, कोविड केंद्राचे व्यवस्थापन, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व उपायांवर होणारा खर्चदेखील याच निधीतून करणे अपेक्षित आहे.

मात्र याला हरताळ फासत पालिकेचे नियंत्रण असलेल्या स्मशानभूमीच्या चालकांकडून करोना बळीच्या अंत्यसंस्काराचे पैसे उकळले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक गोरक्षण परिसरात राहणाऱ्या शिवनाथ संभाजी यसंबरे यांचा गुरूवारी संध्याकाळी सेवाग्रामच्या रूग्णालयात करोनाने मृत्यू झाला. आज त्यांचा मृतदेह घेवून सेवाग्रामची रूग्णवाहिका थेट स्मशानभूमीत पोहोचली. यावेळी कंत्राटदाराने पैश्यांसाठी वाद घातला.

मृतकाच्या नातेवाईकांनी त्यांच्या नगरसेविका राधा चरणसिंह चावरे यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांचे पुत्र डॉ. सुनील चावरे यांनी असे पैसे घेणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले. मात्र तरीही न ऐकल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी खर्चापोटी १ हजार ९०० रूपयांची पावती फाडली. त्यानंतरच अंत्यसंस्कार झाले.  या प्रकरणी वर्धा पालिकेचे मुख्याधिकारी विपिन पालिवाल यांना विचारणा केल्यावर त्यांनी ही तक्रार आली असून चौकशीचे आदेश दिल्याचे लोकसत्ताशी बोलतांना नमूद केले. करोना बळीच्या अंत्यसंस्काराची तरतूद आहे. मात्र या प्रकरणात सदर मृत व्यक्ती करोना बाधित आहे अथवा नाही हे तपासले. असल्यास घेतलेले पैसे परत केले जातील. तर डॉ. चावरे म्हणाले की आज चौकशी केल्याने ही बाब उघडकीस आली. यापूर्वीही पैसे उकळले गेले असल्यास त्याचे काय, असा सवाल त्यांनी केला.