चंद्रकांत पाटील यांचे आव्हान

कराड : भाजपच्या झंझावाताला घाबरूनच दोन्ही काँग्रेस एकत्र येत आहेत. तरी, त्यांनी हिम्मत असले तर स्वतंत्र लढून दाखवावेच असे आमचे आव्हान असल्याचे सांगताना, कोल्हापूर, सांगलीप्रमाणेच सातारा जिल्ह्यतही भाजपचा करिश्मा दिसून येईल, असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीवेळी मसूर (ता. कराड) येथे मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी आवर्जुन संवाद साधला. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी कराड उत्तर मतदारसंघातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. सातारा जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष व माजी आमदार (कै.) यशवंतराव पाटील तथा आबासाहेब पार्लेकर यांच्या पार्ले-बनवडी येथील समाधीला मंत्री पाटील यांनी अभिवादन केले. आबासाहेब पार्लेकर यांचे पुत्र अशोकराव यांच्याशी कमराबंद चर्चाही केली. परंतु, त्याचा तपशील मिळू शकला नाही.

पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की आपण तीन दिवसांच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर असून, कराड उत्तर, कराड दक्षिण व माण-खटाव या विधानसभेच्या तीन मतदारसंघांमध्ये संपूर्ण एक दिवस असा हा आपला दौरा आहे. सातारा जिल्ह्यतील विधानसभेच्या ८ पैकी ६ मतदारसंघांमध्ये भाजपने विजयाची खात्री बाळगली आहे. त्यात किमान ४ जागा तरी आम्ही खेचून आणू असाही विश्वास त्यांनी दिला. कराड उत्तरेत हणबरवाडी-धनगरवाडी पाणी योजनेच्या पूर्ततेचे स्वप्न दाखवून विधानसभेच्या पाच निवडणुका विरोधकांनी जिंकल्या आहेत. मात्र या योजनेला निधी देऊन चालना देण्याचे काम आम्ही केले असून, होऊ घातलेल्या निवडणुकीत विजयही मिळवू आणि ही पाणी योजनाही मार्गी लावू असा दावा पाटील यांनी केला. माण-खटावमधील १६ गावांच्या पाणी प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका भाजपनेच घेतली. आवश्यक १६ कोटींचा निधी देऊन हा पाणी प्रश्नही मार्गी लावल्याचे ते म्हणाले. आम्ही केवळ आश्वासने देत नाही. प्रत्यक्ष कामाच्या निविदा जाहीर केल्यानंतरच त्या कामाला श्रीफळ वाढवल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्यतील बँका व पतसंस्था आर्थिकदृष्टय़ा गोत्यात आल्याने सभासद, ठेवीदार, जामीनदार व या संस्थांमधील कर्मचारीवर्गाचे हाल सुरू असल्याकडे चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, की कायद्याच्या प्रक्रियेनेच सर्वाना जावे लागणार आहे. विशेषत: कराड जनता सहकारी बँक पुरती अडचणीत आल्याची बाब आम्ही गांभीर्याने घेतली असून, त्यात बारकाईने लक्षही घातले आहे. पुण्यातील रूपी बँक अडचणीत आली तेव्हा ती संयमाने सुस्थितीत आणण्यात आली असे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अ‍ॅड. भरत पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, जितेंद्र पवार यांची उपस्थिती होती.