मुंबई-गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच राज्यातल्या अनेक प्रमुख शहरांमध्ये खड्ड्यांची समस्या जैसे थेच आहे. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांनी लक्षवेधी उपस्थित केली. ज्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरचे खड्डे आणि पुलांच्या दुरुस्तीचे काम १५ ऑगस्ट पर्यंत संपवा असे आदेशच दिल्याचे उत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. विशेष बाब म्हणजे पुढील पावसाळी अधिवेशनात मुंबई-गोवा महामार्गावरचे खड्डे हा विषयच येणार नाही त्याआधीच काम पूर्ण करू असेही पाटील यांनी सांगितले.

मुंबई गोवा महामार्ग पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. रस्त्याची चाळण झाली आहे त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे असे अनिकेत तटककरे यांनी सांगितले. यावर उत्तर देत मुंबई-गोवा महामार्गावरच्या वडखळच्या पुढे असलेले काम सध्याच्या कंत्राटदाराऐवजी दुसऱ्या कंत्राटदाराला दिले जाईल असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. खड्डे बुजवण्याचे काम त्वरित सुरू करावे असे आदेश देण्यात आले आहेत. पुढील पावसाळी अधिवेशनात हा विषयच येणार नाही असे पाहू असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.