मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोघेही सध्या नाशिकमध्ये आपल्या दौऱ्यासाठी गेले आहेत. राज ठाकरेंचा हा तीन दिवसीय दौरा असून ते नाशिकमधल्या शासकीय विश्रामगृहात राहणार आहेत आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही याच विश्रामगृहात आहेत. आता या दोघांमध्ये भाजपा-मनसे युतीबद्दल चर्चा होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

हे दोन्ही नेते सध्या नाशिकमध्येच आहेत. शिवाय एकाच विश्रामगृहात राहणार आहेत. त्यामुळे हे दोघे एकमेकांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे दोघे भेटले तर ते युतीसंदर्भात चर्चा करतील अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा – मनसेसोबत युती करणार का?; देवेंद्र फडणवीसांनी केलं सूचक विधान

राज ठाकरे कालच नाशिकच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते या दौऱ्यावर आले आहेत. त्यासोबतच ते काही कार्यकर्त्यांची भेटही घेणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते नाशिकमध्ये आल्याची चर्चा आहे.

राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोघेही एकाच ठिकाणी मुक्कामाला असल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये आज रात्री उशिरापर्यंत भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीत नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबई महापालिकेतल्या युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाटील आणि राज ठाकरे यांची ही पहिलीच भेट ठरणार आहे. त्यामुळे या भेटीतून राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची चर्चा आहे.

दरम्यान, पाटील यांनी कालच मनसेशी युती करण्याबाबत मोठं विधान केलं होतं. मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलत नाही तो पर्यंत युती शक्य नाही, असं ते म्हणाले होते. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या जीवावर सत्ता येणार नाही. आमचा जुना परिचय आहे. योग आला, तर त्यांना भेटेन. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.