भाजपात प्रवेश करण्यास नकार दिल्यानेच हसन मुश्रीफांच्या घरावर छापेमारी घडवून आणत सूड उगवल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. कागल येथील मुश्रीफांच्या घरावर प्राप्तीकर विभागाच्या छाप्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटले असून राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी याचा निषेध नोंदवत मुश्रीफांच्या घराबाहेर भाजपा विरोधात घोषणाबाजी केली.

कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनी मुश्रीफांच्या समर्थनार्थ या निषेध आंदोलनात भाग घेतला. मुश्रीफांवर छापेमारीची कारवाई राजकीय द्वेषातून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, ‘चंद्रकांत पाटलांच्या इच्छेप्रमाणे आमदार हसन मुश्रीफ यांनी भाजपात प्रवेशास नकार दिल्याने त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे’.

मुश्रीफांनी साखर कारखाना सभासदांचे पैसे जमा केले होते तेव्हाही अशीच कारवाई करण्यात आली होती. पण त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने आता मुश्रीफ आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. मुश्रीफ हे फकीर आहेत, झडती घेतलीच तर त्यांच्या घरात मोराची पिसे सापडतील, अन्य काही मिळणार नाही असा टोला माने यांनी यावेळी चंद्रकांत पाटलांना लगावला.

सरकारी कामात व्यत्यय आणू नका, समर्थकांना मुश्रीफांची हात जोडून विनंती

कागलमधील घरावर प्राप्तिकर विभागाची धाड पडल्यानंतर त्यांच्या घरासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीला आमदार मुश्रीफ यांनी हात जोडून गर्दी करू नका, सरकारी कामात अडथळा आणू नका अशी विनंती केली. तरी सुद्धा कार्यकर्त्यांची मुश्रीफ यांच्या घरासमोरील गर्दी वाढतच राहिली. तशातच वृद्ध, निराधार अशा तीनशेहून अधिक महिलांचा एक घोळका हसन मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत त्यांच्या घरासमोर आला. ‘मुश्रीफ साहेब आमचा देव आहे, या देव माणसाच्या पाठीमागे संकट लावू नका. आमचा आशीर्वाद मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी आहे’ अशा घोषणा या महिला देत होत्या. यामुळे मुश्रीफ यांच्या घराच्या परिसरासह वातावरणच गहिवरले.