महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावर सोपवली आहे. समन्वय मंत्री म्हणून ते काम पाहतात. अशात सीमाभागात झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी कन्नड भाषेत गाणे म्हटले, त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या कृतीचा निषेध नोंदवत समन्वय मंत्री पदावरून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात येते आहे. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पाटील यांच्या विरोधात आंदोलनाची रूपरेषा ठरवणार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातील गोकाक म्हटल्याने नवा वाद उफाळून आला आहे. दुर्गादेवी मंदिर उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले चंद्रकांत पाटील यांनी कन्नड अभिनेता राजकुमारचे गीत म्हटले. बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत मंत्री पाटील यांनी ‘हुट्टी दरे कन्नड नलली हुट्ट बेकू’ या गाण्याचे बोल आळवले. या गाण्याचा अर्थ जन्मले तर कर्नाटकमध्येच जन्मावे, असा होत असल्याने चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मराठी भाषा ,अस्मिता यासाठी झगडणाऱ्या सीमावासियांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कर्नाटकात विधानसभेची तयारी सुरु असताना भाजपचा प्रचार करण्यासाठीच पाटील यांनी जाणीवपूर्वक हे गीत गायल्याचा सूर आता सीमाभागात उमटतो आहे.

समन्वयक मंत्रीपदावरून हकालपट्टीची मागणी

कन्नड प्रेम दाखवणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.मराठी द्वेष्ट्यांच्या सहवासात जाऊन त्यांनी म्हटलेले गाणे संतापजनक असून ते सीमाभागातील मराठी बांधवाच्या भावनावर मीठ चोळणारे आणि निषेधार्ह आहे. त्यांनी हे गीत गायल्यामुळे महाराष्ट्र सीमा प्रश्ना बाबत किती त्यांना कितपत गांभीर्य आहे हे कळून चुकले आहे. त्यामुळे पाटील यांची समन्वयक मंत्री पदावरून हकालपट्टी करून रक्तात मराठी अस्मिता असणारी राजकारण विरहीत व्यक्ती समन्वयक म्हणून नेमणूक करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शिवसेनेचे पाटील यांच्यावर टीकास्त्र

शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी चंद्रकांत पाटील या वक्तव्याचा निषेध केला असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना याची कल्पना दिली असल्याचे सांगितले . समनव्यक मंत्री चंद्रकांत पाटील यांना सीमा भागातल्या मराठी जनतेची कदर नाही . त्यांचे गोकाक येथील वक्तव्य सीमा भागातील मराठी बांधवांचा अपमान करणारे आहे. शिवसेना पक्ष प्रमुखांच्या आदेशानुसार त्यांच्या विरोधात आंदोलनाची रूपरेषा ठरवणार आहे, असे आमदार क्षीरसागर यांनी पत्रकारांना सांगितले.