पवारांचे वर्चस्व मोडून काढण्याचे प्रयत्न

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी ज्येष्ठ भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढील काही महिने बारामतीमध्ये तळ ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मी आता तेथे नियमित जाऊन पक्षाचा विस्तार व ताकद वाढविण्याचे काम करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत पवार यांच्या वर्चस्वाला आव्हान देत बारामतीतील जागाजिंकण्याची घोषणा भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि पाटील यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी अनेक दिवस बारामतीत मुक्काम ठोकला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पाटील यांना टोला लगावत आमच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी निकालाच्या दिवशी बारामतीला यावे, अशी टिप्पणी केली आहे. त्यावर बोलताना मी बारामतीला गुलाल उधळण्यासाठी व मिठाई खाण्यासाठी येणारच आहे, पण ती भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजयाची असेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

पवार कुटुंबीयांच्या बारामतीतील वर्चस्वाला शह देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. या परिसरात पक्षबांधणीकडे फारसे लक्ष दिले गेले नव्हते, पण आता ते  करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.