News Flash

चंद्रपूर : करोना लढ्यात महापालिका आयुक्त राजेश मोहिते, कन्या डॉ. केतकी आघाडीवर

'सलाम त्यांच्या कर्तव्याला' मोहिमेअंतर्गत महापौरांच्या हस्ते गौरव

चंद्रपूर

गेल्या अनेक दिवसांपासून समाजातील विविध आघाड्यांवर करोना आजाराविरूद्ध लढा सुरू आहे. हा लढा आणखी किती काळ सुरु राहणार याचा अंदाज बांधणे सद्यस्थितीला कठीण आहे. या लढ्यात अनेक जण प्रत्यक्ष सहभागी होवून युध्दपातळीवर काम करित आहेत. चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अ‍ॅक्शन मोडमध्ये काम करित आहेत तर त्यांची कन्या डॉ. केतकी राजेश मोहिते करोना रूग्णांना वैद्यकीय सेवा देत आहेत. महापौर राखी कंचर्लावार यांनी या दोघांच्याही कर्तृत्वाला सलाम करत त्यांचा गौरव केला. विशेष म्हणजे करोना रूग्णांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आरोग्य सेवा देणाऱ्या २२ कुटुंबीयांचा सत्कार करून त्यांच्या कर्तव्याला सलाम करण्यात आला.

मूळच्या चंद्रपूरकर असलेल्या डॉ. केतकी राजेश मोहिते या लता मंगेशकर हॉस्पिटल, नागपूर येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. करोना विषाणूला आळा घालण्यासाठी खऱ्या अर्थाने कोविड योद्धा म्हणून डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी काम करीत आहेत. डॉ. केतकीसुद्धा आपले घर, शहर सोडून आज अनेकांसाठी आरोग्यदूताची भूमिका बजावत रुग्णांच्या जीवनासाठी लढा देत आहेत. त्यामुळे महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी डॉ. केतकी राजेश मोहिते यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांचे वडील मनपा आयुक्त राजेश मोहिते व आई सौ. अर्चना राजेश मोहिते यांना शुभेच्छा दिल्या. संकटकाळात आपले कर्तव्य बजाविणाऱ्या डॉ. केतकी मोहिते यांचे त्यानी कौतुक केले.

आरोग्य विभागात कार्यरत डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांचे या लढ्यात योगदान मोठे आहे. करोना लढ्यात युध्दपातळीवर काम करणाऱ्या वैद्यकीय सेवेसंबंधी शहरातील २२ कुटुंबांना महापौर राखी कंचर्लावार यांनी सलाम केला आणि त्यांचा गौरव केला. “देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांची जी मानसिक स्थिती असते, तीच आज या करोना काळात इतर ठिकाणी वैद्यकीय कर्तव्य बजाविणाऱ्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांची आहे. आपल्या शहरातील ज्या कुटुंबीयांची मुले चंद्रपूरबाहेर वैद्यकीय सेवा देत आहे, कुटुंबीयांपासून दूर राहून आपला जीव धोक्यात घालून करोना रुग्णांसोबत काम करीत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहून लढ म्हणणाऱ्या या कणखर आई-वडिलांचा सत्कार करण्याचा हा उपक्रम आहे”, अशी माहिती चंद्रपूरच्या महापौरांनी दिली.

या उपक्रमाअंतर्गत सत्कार करण्यात आलेल्या २२ करोनायोध्यांच्या कुटुंबामध्ये शरद रामावत, डॉ. एम. जे. खान, बलराम डोडानी,डॉ. नरेंद्र कोलते, श्रीमती पौर्णिमा मेश्राम, मुरलीधर रडके, डॉ. प्रमोद बांगडे, भास्कर सुर, अशोक बंग, डॉ. अजय गांधी, संजय खोब्रागडे, गजानन आसुटकर, लेमचंद्र दुर्गे, डॉ. रमण ,डॉ. सुशिल मुंधडा, श्री दामोधर सारडा, श्री दिनेश साधनकर, श्री प्रदीप ठक्कर, श्री अलोक धोटेकर, डॉ. मुरलीमनोहर नायडू व आयुक्त राजेश मोहिते यांचा समावेश आहे.

“करोना रुग्णांची सेवा करणे हे किती धैर्याचे काम आहे याची सर्वांनाच कल्पना आहे. राजेश मोहिते हे मनपा आयुक्त या नात्याने चंद्रपूर शहरवासीयांसाठी करोना लढ्याच्या अग्रस्थानी आहेत. त्यांची कन्याही रुग्णांच्या सेवेत आहे, एका अर्थाने संपूर्ण मोहिते कुटुंबीयच करोना लढ्यात सहभागी आहे. करोना कर्तव्यात सर्वजण आपापली जबाबदारी पार पाडत असल्याचा आपल्याला अभिमान आहे”, असेही महापौर कंचर्लावार यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 5:46 pm

Web Title: chandrapur 22 families along with municipal commissioner mohite felicitated by mayor rakhi kancharlavar vjb 91
Next Stories
1 कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक खरीप पीककर्ज वाटपात देशात अव्वल
2 “देशात ‘अमर,अकबर, अँथनी’ एकत्र राहू नयेत असे भाजपाला वाटते”
3 ‘पहले मंदिर, फिर सरकार’ म्हणणारे ठाकरे आता ‘पहले सरकार, फिर मंदिर’ म्हणताहेत- रावसाहेब दानवे
Just Now!
X