चंद्रकांत पाटील यांची पवारांवर टीका

वाई : शरद पवार यांना पार्थ पवार यांना निवडून  आणण्याची खरोखरच इच्छा होती तर त्यांनी त्याला बारामतीमधून उमेदवारी का दिली नाही ?  शरद पवारांना त्यांच्या पक्षात त्यांचीच घराणेशाही चालवायची आहे, म्हणून त्यांनी बारामतीतून स्वत:ची मुलगी सुप्रिया सुळे हिला उमेदवारी दिल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाबळेश्वर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला.

पाटील यावेळी म्हणाले, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना आपल्या पक्षातील माणसे टिकविता येत नाहीत आणि ते भाजपावर आरोप करतात. ‘नाचता येत नाही अन् अंगण वाकडं’ अशी काँग्रेसच्या नेत्यांची अवस्था झाली आहे.  निवडून येता येत नाही म्हणून ‘इव्हीएम मशिन’वर खापर फोडायचे. आम्ही जर ‘इव्हीएम’ घोटाळा केला असता तर आम्ही बारामतीमध्येही निवडून आलो असतो.

भाजपामध्ये मोठया संख्येने लोक येण्यामागे पंतप्रधान मोदी यांचे कणखर नेतृत्व देशाला लाभले असल्याचे सांगत पाटील म्हणाले,  मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत आहे. भाजपाची मते, सिद्धांत, कार्यप्रणाली लोकांना पटत आहे, म्हणूनच लोक भाजपाकडे आकृष्ट  होत आहेत.

तुम्हाला साध्या साध्या वाटणाऱ्या बाबी तुम्ही सत्ता असताना केल्या नाहीत; त्या आम्ही केल्या. लोकांना घरोघरी गॅस जोडणी, स्वच्छतागृहे, वीज जोडणी दिली, रस्त्यांचे जाळे वाढविले. तुम्हाला हे करता आले नाही, त्यात आमचा काय दोष? अनुदान आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते, हे तुम्हाला करता आले नाही. ते आम्ही केले. हे करताना तुम्हाला कोणी अडविले होते असा सवालही पाटील यांनी केला .  महाबळेश्वरच्या नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे यांचेही या वेळी भाषण झाले. या वेळी  भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र कुंभारदरे, सातारा जिल्हा महिला उपाध्यक्षा वैशाली भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी भाजपात स्थानिक कार्यकर्त्यांंनी प्रवेश केला.