26 September 2020

News Flash

छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही मशिद कधी तोडली नाही, तेच आमचे रोलमॉडेल – गडकरी

भारतातील मुस्लिमांवर अन्याय होणार नाही

छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच एकही मशिद तोडली नाही. तेच आमचे रोलमॉडेल आहेत. ते आमचे आदर्श आहेत, असे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील मुस्लिमांवर अन्याय होणार नसल्याचे स्पष्ट केले. नागपुरात नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात काढण्यात आलेल्या मोर्चाला गडकरी संबोधित करत होते.

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात देशभरात एकीकडे ठिकठिकाणी निदर्शने केली जात असताना, दुसरीकडे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात रविवारी सकाळी लोकाधिकार मंचच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांसह विविध संघटना व नागरिकांचा मोठा सहभाग होता.

यावेळी गडकरी यांनी शिवाजी महाराजांच्या एका आदर्श कृतीचे उदाहरण यावेळी दिले. गडकरी म्हणाले, ”छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याणचा किल्ला जिंकला, तेव्हा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांसमोर नेण्यात आले. त्यावेळी महाराजांनी सुभेदाराच्या सुनेला सन्मानपूर्वक वागणूक दिली होती. त्यांना शिवाजी महाराज यांनी साडी भेट दिली. ओटी भरली. त्यांना सांगितले की, माझी आई एवढी सुंदर असती तर मी पण असाच सुंदर दिसत असतो. या शब्दांत महाराजांनी त्या महिलेचा गौरव केला होता.”

”छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच एकही मशिद तोडली नाही. त्यांनी एकाही मुसलमान बांधवावर कधी अन्याय केला नाही. तेच आमचे रोलमॉडेल आहेत. ते आमचे आदर्श आहेत,” असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी गडकरी यांनी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, ”जेव्हा एखादी गोष्ट पटवून देता येत नाही तेव्हा गोंधळ निर्माण केला जातो. हेच सध्या सुरू आहे. व्होट बँक पॉलिटिक्ससाठी काही पक्षांचे एकच भांडवल आहे. ते म्हणजे लोकांमध्ये भय निर्माण करणे. लोकांमध्ये भय निर्माण करा, हेच काही पक्षांचे काम सध्या सुरू आहे.”

गडकरी म्हणाले की, ”हा कायदा हिंदुस्तानातील मुस्लिमांच्या विरोधात नाही, हे मी येथे स्पष्ट करू इच्छितो. ज्यांचा बँडबाजा वाजला, ते पक्ष आता ‘इस्लाम खत्रे में है’चा डिंडोरा पिटताहेत. आम्ही बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना बाहेर काढणार हे खरे आहे. मात्र भारतीय मुस्लीम बांधवांना याचा कोणताही त्रास होणार नाही. उलट आम्ही भारतीय मुस्लिमांचा विकास करणार आहोत.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2019 1:35 pm

Web Title: chatrapati shivaji maharaj is our role model said nitin gadkari pkd 81
Next Stories
1 CAA : काही पक्ष लोकांची माथी भडकवत आहेत : फडणवीस
2 यंदा ख्रिसमस-थर्टी फर्स्ट ‘जोरात’, पार्टी करणाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’
3 हिंदू असणं पाप आहे का? : गडकरी
Just Now!
X