|| अनिकेत साठे

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवास तोंड द्यावे लागल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला आणि त्यांचा मुलगा पंकज यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघात गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेच्या निकालाने प्रस्थापित नेत्यांसमोर विधानसभेत आपले गड राखण्याचे आव्हान उभे आहे. कारागृहात जावे लागल्याने येवलेकरांशी मध्यंतरी तुटलेला संपर्क नव्याने जोडण्याची धडपड छगन भुजबळ करीत आहेत. नांदगावमध्ये पंकज यांनीदेखील तो मार्ग अनुसरला आहे. पुतण्या समीरला पुन्हा एकदा लोकसभेत पाठविता आले नाही. विधानसभा निवडणुकीत आता भुजबळ पिता-पुत्राची परीक्षा आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे दोन्ही जागांवरील निवडणूक त्यांना सोपी राहिलेली नाही.

नाशिकसह राज्याच्या राजकारणावर बराच काळ वर्चस्व ठेवणारे छगन भुजबळ यांना लोकसभा निवडणुकीत दुहेरी धक्का बसला. नाशिकमध्ये पुतण्या समीर तर दिंडोरीत राष्ट्रवादीच्या उमेदवारास पराभव पत्करावा लागला. महायुतीने छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात २८ हजार तर पंकज प्रतिनिधित्व करीत असलेल्या नांदगावमध्ये पाऊण लाखाचे मताधिक्य मिळवले. या आकडेवारीने भुजबळांची चिंता वाढली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात पावणेदोन वर्षे छगन भुजबळ आणि समीर हे कारागृहात होते. जामिनावर सुटल्यानंतर राजकीय अस्तित्वासाठी लोकसभा निवडणूक महत्त्वाची मानली गेली; परंतु त्यात अपयश आल्यामुळे भुजबळ पिता-पुत्रांचा विधानसभा निवडणुकीत कस लागणार आहे. पक्षांतर्गतही त्यांच्यासमोर अडथळे आहेत. विधान परिषदेसाठी दिलेला शब्द भुजबळांनी पूर्ण केला नाही. त्यामुळे येवल्यातून त्यांनी आपणास उमेदवारी देण्याची मागणी त्यांचे सहकारी अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसने या जागेवर हक्क सांगितला आहे. काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा रश्मी पालवे यांनी काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास इतर पक्षातून रिंगणात उतरण्याचे जाहीर केले आहे. एकीकडे विरोधकांचे आव्हान अन् दुसरीकडे पक्षांतर्गत बंडाचे निशाण अशा कोंडीत सापडलेल्या भुजबळांनी दोन महिन्यांत मतदारसंघात दौरे वाढविले आहेत. सत्ताकाळात सहजपणे न भेटणारे भुजबळ आता नागरिकांना बराच वेळ देतात. समस्या जाणून त्यावर आवाज उठवताना दिसतात. हा बदल बरेच काही सांगणारा आहे.

विकासकामांवरून श्रेयाची लढाई

दुष्काळग्रस्त येवला मतदारसंघाची निवडणूक तीन दशकांपासून मांजरपाडा प्रकल्पाभोवती फिरत आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम भाजप-सेना महायुतीच्या काळात नुकतेच पूर्णत्वास गेले. त्यावरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये श्रेयाची लढाई आहे. सत्तेत असताना भुजबळांनी येवला मतदारसंघात अनेक प्रकल्प साकारले. दहा वर्षांतील कामांचा वेग विरोधी बाकावर बसल्यानंतर झपाटय़ाने ओसरला. पाच वर्षांत फारशी विकासकामे झाली नाहीत. वीजपुरवठय़ासह तत्सम काही कामे मार्गी लागली. पण त्यांनी उभारलेले क्रीडांगण, जलतरण तलाव, भुजबळांच्या नावे असणारा बोट क्लब, उड्डाणपुलासह रस्त्यांची दुर्दशा झाली. त्यांची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने भुजबळांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याचा सूर उमटत आहे. पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नांची दाहकता दुष्काळात नव्याने समोर आली.

आमदार पंकज भुजबळ यांच्या नांदगाव मतदारसंघात देखील वेगळी स्थिती नाही. सुरुवातीला आमदारांनी मतदारसंघाशी फारसा संपर्क ठेवला नव्हता. स्वीय सहायकांमार्फत संपर्क राखण्यावर समाधान मानले. दुष्काळात मनमाडकरांना पाण्यासाठी अक्षरश: तिष्ठत बसावे लागले. निवडणुका समीप आल्यामुळे ‘पीए संस्कृती’द्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधणे सुरू केले आहे. गेल्या वेळी भाजप-शिवसेनेतील मतविभागणीमुळे पंकज भुजबळ हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेत पोहचले. पाच वर्षांत येवला, नांदगाव मतदारसंघातील समीकरणे बदलली. भुजबळांपासून अनेक पदाधिकारी दुरावले आहेत. ग्रामपंचायत, नगरपालिका, बाजार समिती अशी अनेक सत्ताकेंद्रे हातातून निसटली. आगामी निवडणुकीत सेना-भाजपच्या संभाव्य युतीमुळे मतविभागणीची शक्यता धूसर आहे. उलट वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे पुन्हा हक्काची मते गमावण्याचा धोका आहे. जिल्ह्य़ात राष्ट्रवादी आधीच खिळखिळी झाली आहे. पक्षातील मराठा-ओबीसी सुप्त संघर्ष मिटत नाही. लोकसभा निवडणुकीत काहींनी पक्षविरोधी काम केल्याच्या तक्रारी झाल्यानंतर छगन भुजबळांनी त्यांची नावे लेखी स्वरूपात देण्याची सूचना केली होती. एक गट इतरांना संशयाच्या भोवऱ्यात उभे करतो. नेत्यांकडून कळत-नकळतपणे त्यास खतपाणी घातले जाते. एकंदर परिस्थितीत भुजबळ पिता-पुत्रांची आपापले गड राखताना कसोटी लागणार आहे.