शासकीय नोकरीतील नियुक्यांसाठी मराठा समाजातील तरुणांचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. गेल्या ३५ दिवसांपासून हे तरुण आंदोलन करत असून, सोमवारी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सोमवारी आझाद मैदानात जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे छत्रपती संभाजीराजे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

मराठा समाजातील तीन हजार ५०० तरुणांच्या नियुक्तीचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्ह आहेत. गेल्या महिनाभरापासून मराठा समाजातील तरुणांनी नियुक्तीच्या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांची सोमवारी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भेट घेतली. भेटीनंतर संभाजीराजे यांनी मागण्यासंदर्भात भूमिका मांडली. ‘मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांची भेट घेतली. सरकार उमेदवारांच्या नियुक्त्या करत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा मराठा समाजातील तरुणांनी घेतला आहे. आरक्षण जाहीर केल्यावर १६ टक्के आरक्षणामधून ज्या तीन हजार ५०० तरुणांना नोकरीसाठी कॉल आला, त्यांना काम मिळालं नाही. मला कोणत्याही सरकारला दोष द्यायचा नाही. पण आता या तरुणांना न्याय कुणी द्यायचा? हे सरकार कोण चालवतं, मुख्यमंत्री की अधिकारी? हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची मंत्रीपरिषद चालवत आहे की सरकारी बाबू? हा माझा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेणार आहे, त्यातून समाधानकारक मार्ग निघेल अशी माझ्यासह सर्वांची अपेक्षा आहे,” असं संभाजीराजे भोसले म्हणाले.

नियुक्त्या द्या, अन्यथा…

“मराठा तरुणांचं आंदोलन सुरू आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तरुणांना न्याय देण्याची भूमिका सरकारनं घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरू,” असा इशारा छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिला.

अशोक चव्हाण यांना हटवा

राज्य सरकारनं मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. त्यांच्या नियुक्तीला आंदोलकांनी विरोध दर्शवला आहे. त्या समितीवरून अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.