नागपूर : कोकणातील नाणार प्रकल्पावर सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडली, मात्र  याच प्रश्नावर त्याच्याबाजूला बसलेले उद्योगमंत्री व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांना मात्र त्यांनी बोलण्याची संधी दिली नाही.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरीवर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी नाणार प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. यावर सरकार आणि शिवसेनेची भूमिका काय, असा प्रश्न केला असता मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर देताना सरकारची बाजू मांडली. आम्ही हा प्रकल्प लोकांवर लादणार  नाही, शिवसेनेची भूमिका आम्ही समजून घेतली असून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले. त्याचवेळी शिवसेनेची या बाबतची भूमिका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट करावी, असे पत्रकारांनी सुचवले असता ‘ही माझी पत्रकार परिषद आहे’ असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सुभाष देसाई यांना बोलू दिले नाही.

 दुधाबाबत धोरण

दुधाचे दर वाढावे म्हणून सरकारने  यापूर्वी दूधापासून भुकटी तयार करण्याची योजना तयार केली होती, मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आता याबाबत इतर राज्यातील योजनांचा अभ्यास करून सरकार याच अधिवेशनात नवीन धोरण जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तूर नोंदीत फेरफार करणाऱ्या बाजार समित्यांवर कारवाई

तूर खरेदीसाठी बाजार समित्यांमध्ये नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत फेरफार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून अशा बाजार समित्यांवर आणि तेथील संगणक ऑपरेटरवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सरकारने तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोदणी सुरू केली होती. ज्यांनी नोंदणी केली, पण त्यांची खरेदी झाली नाही, त्यांना सरकारने एक हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. अनेक बाजार समित्यांनी त्यांच्याकडील शेतकरी संख्येच्या नोंदीत फेरफार केल्याचे आढळून आले आहे.