News Flash

…तर मुख्यमंत्र्यांनाही ‘स्वच्छ’ होऊन जनतेसमोर यावे लागेल: शिवसेना

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर काँग्रेसने, खास करून पृथ्वीराज चव्हाण यांनी भूखंड घोटाळ्याचा जो गडगडाट केला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांसमोर नक्कीच विजा चमकल्या

सिडको भूखंड घोटाळ्यावरुन शिवसेनेनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांना फाजील ‘लाड’ भोवल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. खडसे यांना भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्र्यांनी घरी बसवले होते. कारण स्वच्छ पारदर्शक कारभाराचे ते भोक्ते आहेत. मग आता मुख्यमंत्र्यांना खडसे यांना मंत्रिमंडळात घ्यावे लागेल, नाहीतर मुख्यमंत्र्यांनाही ‘स्वच्छ’ होऊन जनतेसमोर यावे लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

कोयना धरणग्रस्तांच्या नावाने मंजूर केलेली २४ एकर जमीन राजकीय वरदहस्ताने अवघ्या काही दिवसांमध्ये बिल्डरच्या घशात गेली असून मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने राज्य सरकारचा हा १७६७ कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसने सोमवारी केला होता. यापार्श्वभूमीवर बुधवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर काँग्रेसने, खास करून पृथ्वीराज चव्हाण यांनी भूखंड घोटाळ्याचा जो गडगडाट केला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांसमोर नक्कीच विजा चमकल्या आहेत. हा आरोप पुराव्यासह झाला असून हा ‘स्फोट’ करणारे पृथ्वीराज चव्हाण आहेत हे लक्षात घेतले तर १७०० कोटींचा भूखंड घोटाळा साधा नाही. पावसाळी अधिवेशनात हा घोटाळा भाजपाला स्वस्थता लाभू देणार नाही, असा सूचक इशाराच अग्रलेखातून देण्यात आला आहे.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राखीव असलेल्या या जमीन व्यवहारात एकेकाळचे अजित पवारांचे खासमखास व आता मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘खास’ प्रसाद लाड यांचे नाव समोर आले. शेतकऱ्यांना तसेच सरकारला फसवले जात असताना नगरविकास खात्याचे अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी, सिडकोचे एम.डी. गप्प का बसले? कोणाच्या दबावामुळे हा घोटाळा सुरळीत पार पडला?, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

काँग्रेसनेही आत्तापर्यंत असंख्य घोटाळे केले. घोटाळ्याचा प्रत्येक आरोप काँग्रेसने नाकारला. मुख्यमंत्र्यांनीही सिडको भूखंड घोटाळ्याचा आरोप नाकारला आहे. आता मुख्यमंत्र्यांना खडसे यांनाही मंत्रिमंडळात घ्यावे लागेल, नाहीतर मुख्यमंत्र्यांना ‘स्वच्छ’ होऊन जनतेसमोर यावे लागेल, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 8:05 am

Web Title: cidco land scam shiv sena hits out at cm devendra fadnavis
Next Stories
1 रुळावरुन ढिगारा हटवला, पश्चिम रेल्वे सुरळीत
2 परदेशी विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळवण्यामध्ये महाराष्ट्रातील दलित विद्यार्थी देशात अव्वल
3 निवडणूक प्रचारासाठी मुले भाडय़ाने!
Just Now!
X