सर्वाधिक मतदारसंख्या असणाऱ्या तुळजापूर विधानसभेतील मतदारांचा कौल विजयी उमेदवार ठरवणार असल्याने पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. केवळ पालकमंत्रीच नाहीतर त्यांचे चिरंजीव व जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण यांच्याशीही गुफ्तगू झाल्याने आघाडी धर्माची चर्चा जिल्हय़ात रंगली आहे. बार्शी आणि तुळजापूर मतदारसंघाचा कौल महत्त्वपूर्ण असल्याने सभेला आलेले नेते बंद खोलीत आवर्जून चर्चा करत आहेत
सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील ११ तालुक्यांचा मिळून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. या मतदारसंघात १७ लाख ७ हजार ६५९ मतदार आहेत. त्यापकी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या ३ लाख १६ हजार ४३९ एवढी आहे. अन्य पाच विधानसभा मतदारसंघापकी ही संख्या सर्वाधिक आहे. तुळजापूर तालुक्यात पालकमंत्री मधुकर चव्हाण यांची एकहाती सत्ता आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला नामोहरम करीत तुळजापूर पंचायत समितीवर पालकमंत्री चव्हाण यांनी वर्चस्व मिळविलेले आहे. तुळजापूर नगरपालिका वगळता तालुक्यातील नळदुर्ग पालिकेवरदेखील चव्हाण यांचेच वर्चस्व आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण नऊ गट आहेत. त्यातील पाच गटांवर काँग्रेस, तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तर केवळ एका गटातून शिवसेनेला यश मिळाले आहे. त्यामुळे चव्हाणांचे सहकार्य मिळावे यासाठी राष्ट्रवादीचे बडे नेते त्यांच्याकडे विशेष लक्ष देत आहेत.
मागील निवडणुकीत बार्शीमधून खासदार डॉ. पाटील यांना निर्णायक मताधिक्य मिळाले होते. शिवसेनेला एकटे बारबोले सोडले तर मागील निवडणुकीत आधारासाठी दुसरे स्थान नव्हते. तरीदेखील सेनेला बार्शीमधून ५४ हजार मते मिळाली होती. यंदा भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र मिरगणे शिवसेनेचा जाहीर प्रचार करीत आहेत. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या भूमिकेकडे सर्वाचेच लक्ष लागून आहे. राऊत यांची भूमिका बार्शीतील मागील निवडणुकीतील मताधिक्याची परंपरा कायम ठेवणार की खंडित करणार, यावर लोकसभेच्या विजयाची दारोमदार विसंबून असणार आहे.