मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

औरंगाबाद : मराठवाडय़ाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी केलेल्या विविध योजनांचा उल्लेख करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेततळयांपैकी ३५ टक्के शेततळी या भागात झाल्याचे सांगत जलयुक्त शिवार योजनेतून सुमारे ६० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आल्याचा दावा केला. हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर बोलत होते. डीएमआयसी प्रकल्पामुळे येत्या काळात मोठी गुंतवणूक येईल असा दावा करताना आता वीज दरही छत्तीसगडच्या तोडीचा किंबहुना त्यापेक्षा कमी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

हैदाराबाद मुक्तिसंग्रामात हौतात्म्य पत्करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना देण्यात आली. हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. या वेळी मंत्री दिवाकर रावते, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, सतीश चव्हाण, प्रशांत बंब, भाऊसाहेब चिकटगावकर, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

देश स्वतंत्र झाल्यानंतर अधिकाराचा गैरवापर करत निजामाने हैदराबाद संस्थानाबाबतचा निर्णय घेतला. त्या विरोधात मराठवाडय़ातील स्वातंत्र्यसैनिकांनी उठाव केला होता. त्याचे फलित म्हणून मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जातो. त्यांनी त्यांचे कार्य केले आहे. आता आपल्याला या भागाचा विकास करायचा आहे, म्हणूनच मराठवाडय़ाच्या हक्काचे पाणी शेततळ्यांची निर्मिती, १४ प्रकल्पातील पाणी एकत्रित करून मराठवाडा वॉटरग्रीड तयार करण्याचे सरकारने ठरवले आहे.

बळिराजा संजीवनी योजनेतून १५ हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी मराठवाडय़ाला दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस सेवेचा सर्वाधिक फायदा मराठवाडय़ाला होणार आहे. विशेषत: औरंगाबाद आणि जालना ही शहरे उद्योगांसाठी आकर्षण ठरतील. डीएमआयसीसारख्या उपक्रमातून ११ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून तीन लाख रोजगार निर्माण होतील, असेही ते म्हणाले. या वेळी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या पुढाकाराने तयार केलेल्या ‘अग्रेसर मराठवाडा’ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.