पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीत आणि उपाययोजनांबाबत माहितीही घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लॉकडाउनचा कालावधी किंमान ३० एप्रिल पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा केली. तसंच लॉकडाउनचा कालावधी कधीपर्यंत वाढवायचा हे तुमच्या हाती आहे असं म्हणत सर्वांनी शिस्त पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

१४ एप्रिलनंतर किती काळ लॉकडाउन ठेवायचा हे आपल्या हातात आहे. आपण शिस्त पाळली तर करोनाच्या साखळीतून लवकर बाहेर पडू. १४ एप्रिल नंतर आपण काय करणार याच्या सूचना लवकरच देण्यात येतील. राज्यात काय सुरू राहिले, कोणते उद्योगधंदे सुरू राहतील याची माहितीही १४ तारखेपूर्वी देण्यात येईल, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. किमान ३० एप्रिल पर्यंत हे लॉकडाउन सुरू राहणार आहे. यादरम्यान काही ठिकाणंची बंधनं शिथिल करता येतील का यावर विचार केला जाईल. तर काही ठिकाणची बंधनं ही या कालावधीत अधिक कठोर करण्यात येतील. लोकांनी शिस्त पाळली पाहिजे. हे संकट धर्म, जात पाहून येत नाही, असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- किमान ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन कायम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

घरोघरी जाऊन पालिकेकडून तपासणी
महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे हे तर खरं आहे. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढले आहेत. कारण मुंबई हे जगाचं प्रवेशद्वार आहे. आपण तपासण्या सुरु केल्या तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतल्या देशांना बंदी होती. मात्र जे देश यादीत नव्हते त्यातले रुग्ण मिसळले. आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत ते भाग सील केले आहेत. जे रुग्ण आपल्याला सापडलेत त्याची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करते आहे. आता समोरुन रुग्ण येण्याची वाट बघत नाही, तर घरी जाऊन चाचण्या करतो आहोत. मुंबईत संख्या १ हजारांवर गेली आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र ही आपल्याला फक्त कमी करायची नाही तर शून्यावर आणायची आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

आणखी वाचा- Coronavirus : भाभा रुग्णालयातील कर्मचारी महिलेला करोनाची बाधा

वय अधिक त्यांना धोका
दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला आहे ती संख्या वाढते आहे. ज्यांचं वय जास्त आहे त्यांचा धोका वाढतो आहे. ज्यांना आधीपासून काही विकार आहेत अशा रुग्णांवर करोनाचा गंभीर परिणाम झालाय. आकाश पांघरुनी जग हे शांत झोपलेले हे गाणं आठवतं आहे. आकाश तर पांघरलं आहे पण झोप उडाली आहे सगळ्यांची अशी अवस्था आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तुम्हाला वाटेल की परिस्थिती गंभीर असताना मला गाणं कसं सुचतं ? पण आज मला या गाण्याच्या ओळी आठवत आहेत असं उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला सांगितलं.