समाज माध्यमांचा दुरूपयोग करून महापुरुषांची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसक घटनांच्या पाश्र्वभूमीवर राज्य  अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी शुक्रवारी सोलापुरात येऊन स्थानिक घटनांची माहिती घेतली व पोलीस अधिकाऱ्यांची पाठ थोपटली. पत्रकार परिषदेतही त्यांनी शहर पोलीस आयुक्त व जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांवर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला. परंतु जेव्हा एखाद्या गावात अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न झाल्याची पोलिसांनी दडवून ठेवलेली माहिती पत्रकारांनी उघड केली, तेव्हा हकीम यांचा चेहरा खाडकन् पडला व ते अस्वस्थ झाले.
३१ मे रोजी फेसबूकवर महापुरुषांच्या बदनामीकारक छायाचित्रासह मजकूर प्रसिध्द झाल्यानंतर राज्यात सोलापूरसह पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जवळपास सर्व ठिकाणी हिंसक घटना घडल्या. या पाश्र्वभूमीवर माहिती घेण्यासाठी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी आयोगाच्या अन्य सदस्यांसह सोलापूरला भेट दिली. या भेटीत त्यांनी शहर पोलीस आयुक्त प्रदीप रासकर व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मकरंद रानडे यांच्यासमवेत बैठक घेऊन आढावा घेतला. तसेच पुण्यात हिंसक तरुणांच्या हल्ल्याचा बळी गेलेल्या सोलापूरच्या मोहसीन सादिक शेख यांच्या घरी धाव घेऊन शेख कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. याशिवाय पुण्यातच एका खासगी आराम बसवरील दगडफेकीत गंभीर जखमी होऊन सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वसंत रामचंद्र रुपनर (४०, रा. चिकमहूद, ता. सांगोला) यांच्या नातेवाईकांचीही     भेट घेतली.
सोलापूर भेटीसंदर्भात माहिती देताना हकीम यांनी सायंकाळी एका पत्रकार परिषदेत, सोलापूर शहर व जिल्ह्य़ात कोठेही अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न झाला नसल्याचा दावा करताना पोलीस प्रशासनावर स्तुतिसुमने उधळली. पुणे, सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्य़ाच्या तुलनेने सोलापूर जिल्ह्य़ात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोलीस यंत्रणेला चांगले यश आले. एसटी बसेस व खासगी बसेसवर दगडफेकीचे प्रकार घडले. याप्रकरणी शहरात ६१ समाजकंटकांना अटक करण्यात आली. तसेच नंतरच्या घटनांमध्ये पुन्हा १५२ समाजकंटकाना जेरबंद करण्यात आल्याचे हकीम यांनी सांगितले. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत  असताना कोठेही अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. तथापि, ३१ मे रोजीच्या घटनेत मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे घडलेल्या घटनेबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी कसलीही माहिती दिली नसून त्यासंदर्भात आपण अनभिज्ञ आहोत, असे स्पष्ट केले. चार हजार लोकसंख्येच्या नरखेड गावात काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्षांनुवर्षे प्राबल्य असून तेथे  हिंदुत्ववादी संघटना औषधाला देखील नाहीत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील व काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी असलेले त्यांचे बंधू संतोष पाटील हे याच गावचे. मोहोळ तालुक्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांचे गाव अनगर हे नरखेडपासून जवळच्या अंतरावर आहे. परंतु महापुरुषाच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या घटनेचे निमित्त करून नरखेडसारख्या छोटय़ाशा गावात अविचारी तरुणांच्या जमावाने धुडगूस घालून अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तींच्या दुकानांसह धार्मिकस्थळाची नासधूस केल्याचा व महिलांच्या अंगावर हात टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात संबंधित समाजकंटकांविरूध्द त्याचवेळी गुन्हाही दाखल झाला होता. या घटनेनंतर नरखेड गावाला सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल, मोहोळचे आमदार प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्यापासून प्रदेश राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील यांच्यापर्यंत कोणीही भेट देऊन अल्पसंख्याक समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेच्या माहितीपासून अल्पसंख्याक आयोगही अनभिज्ञच असल्याचे दिसून आले. घटनेप्रकरणी गुन्हा दाखल असताना त्याची माहिती अल्पसंख्याक आयोगाला दिली गेली नाही, याचे कोडेही उमगले नाही, असे हकीम यांनी सांगितले.
महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना समाज माध्यमांवर केली जात असताना दुसरीकडे या घटनेचे निमित्त करून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसून येतो. यात सोलापुरातील सत्ताधारी पक्षाच्या एका जबाबदार लोकप्रतिनिधीचाही उघडपणे  सहभाग असल्याचे मुनाफ हकीम  यांच्या निदर्शनास आणून दिले तेव्हा यासंदर्भात पोलिसांनी गांभार्याने घेऊन कोणीही कितीही मोठा असला तरी त्याची तमा न बाळगता कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.