वडझिरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुजाता एरंडे तसेच ग्रामसेवक बी. एम. जगदाळे व डी. एस. भोसले यांच्यावर ग्रामपंचायतीमधील ५ लाख ४६ हजार ७३७ रुपयांच्या अपहाराची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सरपंच तसेच ग्रामसेवकांना पुढील कायदेशीर कारवाई का करू नये, अशा आशयाची नोटीस गटविकास अधिकारी किरण महाजन यांनी संबंधितांना बजावली आहे.
दरम्यान, पंचायत समितीच्या या कारवाईमुळे वडझिरे गावात एकच खळबळ उडाली असून, सरपंच तसेच ग्रामसेवक तक्रारदारांना तक्रार मागे घेण्याची विनवणी करू लागले आहेत. वडझिरे ग्रामपंचायतीमधील विविध भ्रष्टाचारासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य पोपट शेटे व इतरांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे थेट विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर चौकशी समिती नेमून ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहारांची मालिकाच बाहेर आली.
गट नंबर ६६२ मधील अनधिकृत बांधकाम, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर विहिरी, ग्रामपंचायतीच्या करवसुली यातील अनियमितता, ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण व त्याच्या पुस्तकाच्या कार्यवाहीबाबत, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीअंतर्गत केलेल्या कामांचे मूल्यांकन, तेराव्या वित्त आयोगांतर्गत केलेल्या खर्चातील अनियमितता, इंदिरा आवास घरकुल योजनेतील अनियमितता, ग्रामपंचायत कर्मचारी मानधन अनियमितता याबाबत सरपंच व ग्रामसेवकांवर ठपका ठेवण्यात आला आहे.