सांगली महापालिका निवडणूक

महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी दोन पावले माघार घेतली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्यासोबत काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार, महापौर हारूण शिकलगारही उपस्थित होते. मात्र, काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांची उपस्थिती जाहीर करण्यात आली असतानाही त्या हजर नव्हत्या.

श्यामनगर येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व आरक्षणबाधित रहिवाशांना एनए प्रमाणपत्राचे वाटप जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, नगरसेवक संतोष पाटील, युवराज गायकवाड उपस्थित होते. प्रभागाचे नगरसेवक विष्णू माने यांनी स्वागत करीत विकासकामांचा आढावा घेतला.

आ. पाटील म्हणाले, की महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी करण्याबाबत अद्याप बोलणी सुरू झाली नसली तरी या बाबत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील. सध्या भाजपला महापालिका सत्तेची स्वप्ने पडू लागली असली तरी सामान्य माणूस भाजप शासनाच्या कारभाराला वैतागला आहे. याचे पडसाद या निवडणुकीच्या निमित्ताने दिसतील.

सध्या देशात महागाई वाढली आहे. पूर्वी भाजपचे नेते मोच्रे काढत होते, पण आता पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाली. मोच्रे काढणारे भाजपचे नेते कुठे आहेत, असा सवाल केला. भाजपने निवडणुकीपूर्वी धनगर, मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, पण ते पाळले नाही. सामाजिक प्रश्नावर त्यांना उत्तर देता येत नाही. जनतेची फसवणूक सुरू आहे. त्यांच्या कारभाराचा आम्ही पर्दाफाश करू.

महापौर हारूण शिकलगार म्हणाले, की कुपवाड ड्रेनेज योजनेचा ठराव केला आहे. लवकरच योजनेला मंजुरी मिळेल. पाच वर्षांत महापालिकेच्या वतीने ७० कोटीची रस्त्याची कामे झाली आहेत. जलशुद्धीकरण केंद्राची १६ला चाचणी होणार आहे. त्यामुळे सांगली व कुपवाडला शुद्ध पाणी मिळेल, असे सांगितले.