सांगली : सांगली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. मात्र काँग्रेसनेही सत्ता कायम राखण्यासाठी कंबर कसली असून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र स्थानिक पातळीवरील राजकारण आणि प्रस्थापित नेत्यांची मानसिकता यावरच ही आघाडी होणार की नाही हे ठरणार असून, आघाडी झालीच तर अखेपर्यंत मनोमीलन होणार का, याबाबत साशंकता आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांसाठी संयुक्त महापालिका स्थापन झाली त्याला १९ वर्षे झाली. महापालिकेवर २००८ चा काळ वगळता काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या विकास महाआघाडीची सत्ता या काळात होती. महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती असे म्हणण्यापेक्षा दिवंगत मदन पाटील यांच्या गटाचीच प्रामुख्याने सत्ता होती असे म्हणणे जास्त उचित ठरेल. कारण या कालावधीत महापालिकेतील पदाधिकारी ठरविण्याचे निर्णय हे काँग्रेस समितीपेक्षा वसंत कॉलनीतील विजय बंगल्यातूनच होत होते.

मतदारांनी आमदार जयंत पाटील यांच्याकडे एक वेळ सत्ता देऊन पाहिली होती. मात्र आघाडीतील बिघाडी अमान्य करीत पुन्हा मदन पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या हाती सत्ता सोपविली. मात्र या पाच वर्षांच्या काळामध्ये मदन पाटील यांच्या अकाली निधनानंतर सत्ताधारी काँग्रेसमध्ये अंतर्वरिोध तीव्र स्वरूपात पुढे आला. या अनियंत्रित कारभारावर नियंत्रण करण्याचे प्रयत्न डॉ. पतंगराव कदम यांनी केले, मात्र ते फारसे यशस्वी ठरले नाहीत. काँग्रेसच्या अंतर्गत विरोधामुळे एक वर्ष तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या होत्या. तर काही प्रभाग समित्यांवर विरोधकांचे वर्चस्व दिसून आले.

गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेसला एकमुखी सत्ता दिली असतानाही विकासाची दाखविलेली स्वप्ने पूर्ण करता आलेली नाहीत. शुद्ध पाणी, डासमुक्ती तर स्वप्नातच राहिली, गेली पाच वर्षे सुरू असलेली सांगली, मिरजेतील ड्रेनेज योजना आणखी किती वर्षे अपूर्ण राहणार याचे उत्तर प्रशासनाकडे नाही, राजकीय व्यक्तीकडे नाही अशी स्थिती आहे. कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च होऊनही ड्रेनेज योजनेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचलेले नाही. ७० आणि ५६ एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. मात्र तो पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास अद्याप किती काळ लागणार याचे उत्तर वचनपूर्तीचा दावा करणाऱ्या काँग्रेसकडे नाही. कृष्णेचे प्रदूषण होत असल्याच्या कारणावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एक कोटीचा दंड केला जातो, याचे कोणालाच गांभीर्य वाटत नाही. शहरात विसाव्यासाठी महाआघाडीच्या काळात उभारण्यात आलेले महावीर गार्डन हे एकमेव उद्यान वगळता दुसरे कोणतेच ठिकाण नाही. ऐतिहासिक आयर्वनि पूल, वसंतदादा समाधिस्थळ येथे लेजर शोचे काम हाती घेण्यात आले, प्रतापसिंह उद्यानाचे सुशोभीकरणाचे काम रेंगाळले. मात्र या तुलनेत महापालिकेसाठी भूखंड खरेदी, जागा भाडय़ाने देण्याचे करार अग्रक्रमाने पूर्ण करण्यात आले.

महापालिकेची सत्ता एकहाती काबीज करण्यासाठी भाजप प्रथमच मदानात उतरला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजपला जिल्ह्यातील जनतेने मोठय़ा आशेने पाठिंबा दर्शवत असताना एक खासदार, चार आमदार, जिल्हा परिषद आणि इस्लामपूर, तासगाव नगरपालिकांची सत्ता दिली आहे. यामुळे अधिक आशावादी झालेल्या भाजपने महापालिकेची सत्ता मिळविण्याचा चंग बांधला आहे. यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सांगली, मिरज फेऱ्या वाढल्या आहेत. यानिमित्ताने वातावरणनिर्मिती करण्याबरोबरच रेडिमेड कार्यकर्त्यांची भाजपमध्ये आवक व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत.

एक काळ असा होता की, भाजपला उमेदवारी जबरदस्तीने कोणाच्या तरी गळी उतरवावी लागत होती. आता मात्र जोरदार शक्तिप्रदर्शन करीत कार्यकत्रे पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी रीघ लावत असल्याचे चित्र तयार करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात काय स्थिती आहे, हे उमेदवारीवाटपानंतर स्पष्ट होणार आहे. भाजप उमेदवारांची पहिली यादी बुधवारी म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशीच जाहीर करण्यात येईल अशी घोषणा महसूलमंत्री पाटील यांनी केली आहे. मात्र यापुढील यादी जाहीर करण्यासाठी अन्य पक्ष उमेदवारी यादी जाहीर करेपर्यंत वाट पाहण्याची तयारी भाजपने ठेवली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी करण्याची तयारी प्रदेश पातळीवरील नेत्यांची आहे. मात्र याबाबतची बोलणी दोन्ही पक्षांनी स्थानिक कार्यकर्त्यांवर सोपविली आहेत. आघाडीमध्ये जागावाटपावरून मतभेद असले तरी ते मिटतील असे दोन्ही बाजूंनी सांगितले जात आहे. मात्र काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यांच्या जागा कोणासाठी द्यायच्या, हा पेच निर्माण झाला आहे. मावळत्या महापालिकेत काँग्रेसचे ४१ तर राष्ट्रवादीचे २४ सदस्य होते. आता पक्षातून आवक-जावक झाल्यानंतर काँगेसचे संख्याबळ ३१ तर राष्ट्रवादीचे २८ झाले आहे. या बदललेल्या गणितावर जागावाटप करण्याचा आग्रह राष्ट्रवादीचा आहे. यात काँग्रेसला ४३ आणि राष्ट्रवादीला ३३ आणि दोन जागा मित्रांसाठी असा प्रस्ताव चच्रेत आला आहे.

दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी व्हावी अशी प्रदेश पातळीवरील नेत्यांची इच्छा असली तरी दोन्ही पक्षांचा एकमेकावर विश्वास नाही. कारण आतापर्यंतच्या निवडणुकीत निवडून आणण्यापेक्षा अडचणी निर्माण करून दुसऱ्याचे उमेदवार पराभूत करण्यासाठीच काही शक्ती कार्यरत राहिल्या आहेत. यामुळे आघाडी झाली तर आघाडी धर्माचे पालन प्रामाणिकपणे होईल का, अशी साशंकता कायम आहे. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली तरी मिरज, सांगली आणि कुपवाडमधील प्रत्येकी एका प्रभागातील उमेदवारीवरून तीव्र संघर्ष दिसत आहे. अखेरच्या क्षणी या तीन प्रभागांत मत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारला जाण्याचेही संकेत मिळत आहेत.

भाजपने उमेदवार यादीसाठी अखेपर्यंत लवचीकता ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे जे निवडून येण्याची शाश्वती आहे अशांची उमेदवारी जाहीर करून अन्य जागांसाठी आयारामांची प्रतीक्षा करण्यात येणार आहे. ही प्रतीक्षा किती काळासाठी असेल तर उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया होईपर्यंत ही लवचीकता असेल. दोन्ही काँग्रेसमधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपमध्ये येतील या आशेवर भाजप आहे. याचाच अर्थ असा की, सांगली, मिरजेचे आमदार भाजपचे असतानाही सक्षम उमेदवारांची आजही भाजपला वानवा आहे.

भाजपने पुढे केलेला मदतीचा हात झिडकारत शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात येणार असून सेनेकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्याही चांगली असल्याचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी सांगितले. मात्र सेनेची ताकद मर्यादित असल्याने याचा सत्तेच्या गणितात फारसा विचार करण्याची गरज सध्या तरी भासत नाही.