पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करीत तसेच भाजपच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील नरमाईच्या भुमिकेवर नाराज असल्याचे सांगत भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले गोंदियाचे खासदार नाना पटोले यांच्यावर काँग्रेस हायकमांडने गुरुवारी महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली. राहुल गांधी यांनी नाना पटोले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी तर भाई नगराळे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याबरोबर आता पटोले आणि नगराळे यांच्यावर पक्षाची महत्वपूर्ण जबाबदारी राहणार आहे.

नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचे स्वागत केले होते. तसेच नाना पटोलेंमुळे पक्षाला विदर्भात नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली होती.

पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सातत्याने लक्ष्य केले होते. भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याची ते सतत्याने टीका करीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला अपमानास्पद वागणूक देऊन माझ्या मतदारसंघातील प्रत्येकाचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकला होता. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांची राहुल गांधी यांच्याशी भेट घालून दिली होती, तेव्हाच त्यांचा काँग्रेसप्रवेश निश्चित झाला होता.

विदर्भातील ओबीसींचे नेते म्हणून नाना पटोलेंची ओळख आहे. ते २००८ पर्यंत काँग्रेसमध्ये होते. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत मतभेद झाल्याने पटोले भाजपमध्ये गेले होते. त्यानंतर गेल्या २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून ते लोकसभेवर निवडून आले होते.